Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हेच आमचे ध्येय ! : दीपक केसरकर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या या अतिशय चिंताजनक असून शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी दीपक केसरकर यांनी केले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आज राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आहे. यशवंतराव चव्हाण यांना जेव्हा दिल्लीत जावे लागले तेव्हा त्यांनी महाराष्ट्राची धुरा नाईक यांच्याकडे सोपविली. त्यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली असून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही त्यांना वंदन करत आहोत. सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व जगासमोर आले आहे. त्यांना शेतकर्‍यांच्या अडचणींची जाणीव आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्राचा निर्धार त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या प्रगल्भ बुध्दीमत्तेच्या नेत्याची साथ असल्यामुळे हे सहजशक्य असल्याचेही ते म्हणाले.

 

भारतीय जनता पक्षाच्या मदतीने शिवसेनेचा एक साधा शिवसैनिक हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेला आहे. राज्यातील जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे काम ते करणार आहेत. राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. यात विशेष करून शेतकर्‍यांसाठी आमचे सरकार काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ग्रामीण सोबतच शहरी भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version