Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खान्देश कन्येचा नवा विश्‍व विक्रम : शीतल महाजन यांचे एव्हरेस्ट शिखरावरून स्काय जंपींग !

जळगाव-संदीप होले ( स्पेशल रिपोर्ट ) | खान्देश कन्या शीतल महाजन यांनी जगातील सर्वात उंच शिखर असणार्‍या माऊंट एव्हरेस्टच्या वरून स्काय जंपींग करून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथील मूळ रहिवासी असणार्‍या पद्मश्री शीतल महाजन यांनी आजवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. यात प्रामुख्याने उत्तर आणि दक्षीण धु्रवावरून उडी मारणार्‍या ( स्काय जंपींग ) त्या जगातील पहिल्या महिला आहेत. विश्‍वातील सर्व खंडांमधून त्यांनी ठिकठिकाणी स्काय जंप करून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.

शीतल महाजन यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने माऊंट एव्हरेस्टच्या वरून विमानातून स्काय जंप करणार असल्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने त्यांनी दिवाळीच्या दिवशी ही कामगिरी पार पाडली आहे. आज त्यांनी यशस्वीपणे ही कामगिरी बजावली असून अशा स्वरूपाचा विक्रम करणार्‍या पहिल्या महिला बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर प्रस्थापित झालेला आहे.

शीतल महाजन यांनी ११ नोव्हेंबरपासून एव्हरेस्टवरून जंप करण्याचे प्रयत्न सुरू केले. यात त्यांनी एकूण चारदा यशस्वीपणे जंप केल्या. पहिल्या दिवशी त्यांनी १७ हजार ५०० फुटांवरून विशेष विमानातून पॅराशुटसह उडी मारली. यात त्या साडेबारा हजार फुट उंचीवर असलेल्या सिंगबोचे विमानतळावर सुखरूप उतरल्या. यामुळे उत्तर व दक्षीण धु्रवासह माऊंट एव्हरेस्ट शिखरावरून स्काय जंपींग करणारी जगातील पहिली महिला म्हणून त्यांची विक्रमाची नोंद झाली.

यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर रोजी शीतल महाजन यांनी सिंगबोचे विमानतळावरून उड्डाण करत त्यांनी आठ हजार फुटांवरून भारतीय राष्ट्रध्वज अर्थात तिरंग्यासह उडी घेतली. ही कामगिरी पूर्ण करत त्यांनी नव्या विक्रमांची नोंद केली.

यानंतर दिनांक १३ नोव्हेंबर रोजी शीतल महाजन यांनी २३ हजार फुट उंचीवरून विमानातून उडी घेत १५०९१ फुट उंचीवरील अमाडबलम शिखरावरच्या बेस कँपवर यशस्वीपणे लँडींग केले. याच दिवशी त्यांनी २१ हजार ५०० फूट उंचीवरून विमानातून उडी मारत १७४४ फुट उंचीवरील कालापत्थर बेस कँपवर सुरक्षितपणे उतरण्याची मोठी कामगिरी पार पाडली. इतक्या उंचीवरून स्काय जंप करणार्‍या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.

माऊंट एव्हरेस्टच्या समोर विमानातून उडी मारणे सोपे नाही. एक तर येथे ऑक्सीजनचे प्रमाण अतिशय अल्प असल्याने कुणालाही लागलीच धाप लागते. यामुळे ऑक्सीजन सिलेंडरचे ओझे घेऊन विमानातून उडी मारावी लागते. उडी मारल्यानंतर पॅराशुट खुलण्यापर्यंतचा कालावधी हा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. जास्त उंची, कमी ऑक्सीजन यामुळे यात अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. मात्र या सर्व अडचणींवर मात करून शीतल महाजन यांनी विक्रमाला गवसणी घातली आहे.

शीतल महाजन या निसर्ग कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पणजी होत. त्यांचे वडील दिवंगत कमलाकर महाजन यांच्या प्रेरणेने त्यांनी स्कायजंप या क्षेत्रात जगभरात ख्याती मिळविली आहे. त्यांनी आजवर साडे सातशे पेक्षा जास्त स्काय जंप केल्या असून अनेक विश्‍व आणि राष्ट्रीय विक्रम त्यांच्या नावावर आहेत. शीतल महाजन यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री या नागरी पुरस्काराने गौरविले आहे. यासोबत, तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसीक पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आता, एव्हरेस्टवरून स्काय जंप करून त्या पुन्हा एकचा चर्चेत आल्या आहेत.

Exit mobile version