Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘द काश्मीर फाईल्स-वर शरद यांचे भाष्य; म्हणाले. . .

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अलीकडच्या काळात तुफान लोकप्रिय झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विस्तृत भाष्य करत भाजपवर टिका केली आहे.

दिल्लीमध्ये आयोजित राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या मेळाव्याला शरद पवारांनी उपस्थिती लावली. या मेळाव्यानंतर रात्री उशीरा प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, या चित्रपटामुळे देशातील एक विचार मारला जात असल्याचं तसंच बंधुप्रेम संपवलं जात   आहे. या चित्रपटामुळे एक विचार मारला जात आहे. त्यात गांधीजी, नेहरू यांचा काय संबंध? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

पवार पुढे म्हणाले की, त्यावेळी जे काही झालं तेव्हा व्ही. पी. सिंग सत्तेत होते. भाजपाचा त्यांना पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री, राज्यपाल कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा मुद्दा तयार केला जातो, त्याची जबाबदारी तेच घेऊ शकतात. जे काही झालं ते देशासाठी चांगलं झालं नाही. त्या लोकांना तिथून इकडे यावं लागलं ही चांगली गोष्ट नव्हती. पण जे झालं ते विसरून समाजात एकता कशी राहील हे पाहिलं पाहिजे, असं शरद पवारांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की,दु:ख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांनी देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरु होतं तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते. असंच सुरु राहिलं तर देशात एकता राहणार नाही, अशी भीती शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.  देशातील धर्मनिरपेक्षतेवर भाजपाचा विश्वास नाही. त्यात पाठिंबा भाजपाला मिळाला आणि सत्ता त्यांच्याकडे आली. एक चित्रपट येतो, त्यात काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले आणि ते हल्ले कॉंग्रेस आणि अल्पसंख्यांकांनी केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदूंवर अत्याचार झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही शरद पवार म्हणाले.

Exit mobile version