Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भागपूर प्रकल्पाचा भुसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजनेस गती येण्यासाठी या प्रकल्पाचा भुसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न सर्व संबंधित विभागांनी प्राधान्याने मार्गी लावावा. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज दिलेत.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात भागपूर उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, भूसंपादन अधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, राजेंद्र वाघ, किरण सावंत-पाटील, कार्यकारी अभियंता श्री. कडलग आदि उपस्थित होते.

 

यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले की, भागपूर गावाचे पुनर्वसन करण्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नजीकच्या गावांमध्ये उपलब्ध जागेचा सर्व्हे करण्यात यावात. आसपासच्या ज्या गावात जागा शिल्लक असेल तेथील ग्रामसभेचा ठराव घेणे, तो जिल्हा परिषदेस सादर करणे आदि कामे संबंधित विभागाने वेळेत करण्याची कार्यवाही करावी. शिवाय जागेची किंमत ठरविण्याचे काम कृषि व वन विभागाने करुन जागेचे भूसंपादनाचे काम भूसंपादन विभागाने करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

 

ग्रामसभेचा ठराव मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेकडील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पाटील यांनी सांगितले. तर आवश्यक ती कार्यवाही झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रीया करण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी संगितले.  भागपूर गावात सध्या 84 नोंदणीकृत घरे तसेच 49 अतिक्रमीत झोपड्या असून लोकसंख्या 370 इतकी आहे. या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी अंदाजे 12 हेक्टर जागा अपेक्षित असल्याचे भूसंपादन अधिकारी श्रीमती भारदे यांनी सांगितले. तर प्रकल्पा विषयीची माहिती व येत असलेल्या अडचणीची माहिती कार्यकारी अभियंता श्री. कडलग यांनी दिली. यावर तातडीने तोडगा काढून आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधित विभागांनी करावी असे निर्देश शेवटी पालकमंत्री यांनी दिलेत.

Exit mobile version