दिव्यांगांची सेवा हाच सर्वात मोठा आशीर्वाद : ना. गुलाबराव पाटील

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । समाजातील वंचित घटकांची सेवा करण्याचे ध्येय आपण आधीपासूनच ठेवलेले आहे. यामुळे वाढदिवसाला भपकेबाज कार्यक्रमांना टाळून समाजउपयोगी उपक्रमांना आपण कायम प्राधान्य देत असतो. गेल्या पाच वर्षांपासून दिव्यांगांना मदत वाटप करण्याचे काम आपण करत असून यातून आपल्याला अतीव समाधान वाटत आहे. दिव्यांगांची सेवा हाच आपला सर्वात मोठा आशीर्वाद मानत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील ग्रामीण रूग्णालयात आयोजीत करण्यात आलेल्या दिव्यांगांना साहित्य व मदत वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आमदार निधीतून तालुक्यातील दिव्यांगांना साहित्य व मदत वाटप करण्यात आली. तसेच यंदा वाढदिवसाला सव्वा लाख वह्या आणि गरजू विद्यार्थ्यांना चप्पल व बुट देण्यात येणार असल्याची घोषणा देखील पालकमंत्र्यांनी केली. तसेच आज पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने शहरातील ३५ चौकांचे तैलचित्रांसह सुशोभीकरणासाठी नगर विकास विभागातून  नाविन्यपूर्ण योजनेतून २ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यातील 3 चौकांतील संतांच्या  तैलचित्रांसह चौकांचे सुशोभीकरणाचे लोकार्पण देखील करण्यात आले.

ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकाच दिवशी कार्यक्रमांमुळे धावपळ उडू नये म्हणून तीन दिवस आधीपासूनच कार्यक्रमांना सुरूवात झालेली आहे. या अनुषंगाने आज धरणगावातील ग्रामीण रूग्णालयात दिव्यांगांना साहित्य वाटप व पिवळे रेशनकार्ड व युनिक आय डी कार्डचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक एस.पी. गणेशकर , प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलिंद बारी, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदराव गोसावी,  दिव्यांग विभागाचे प्रमुख भरत चौधरी, पोलीस निरिक्षक राहूल खताळ, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते पप्पू भावे, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, उप जिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर, दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, भानुदास विसावे, वासुदेव चौधरी, विलास महाजन, धीरेंद्र पुर्भे, रामकृष्ण महाजन,  सुनील चौधरी, भीमराव पाटील,  चंद्रकांत भावसार, गोपाल चौधरी, भागवत चौधरी,  सुरेश महाजन,  संजय चौधरी,  राजेंद्र ठाकरे, चेतन पाटील  यांच्यासह शहरातील व परिसरातील शिवसेना पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या साहित्याचे झाले वाटप

या कार्यक्रमात आमदार स्थानिक विकास निधीतून २५ तिनचाकी सायकली , ७ व्हीलचेयर, १६ कुबड्या, ४ वॉकर, १० वॉकींग स्टीक, ५ अंधकाठी ३४ कर्णयंत्रे असे एकूण १०१ सहाय्यक साहित्याचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात  आले. तसेच संजय गांधी निराधार योजने अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून शासनाच्या दिव्यांग समवेत सुदृढ व्यक्तीच्या विवाह प्रोत्साहन योजने अंतर्गत २ दिव्यांगांना प्रत्येकी ५० हजारचे प्रमाणपत्र वाटप करुन त्यांचा सन्मानपत्र देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक एस. पी. गणेशकर यांनी या कार्यक्रमाचा हेतू विशद केला. ते म्हणाले की, राज्यात पहिल्यांदाच ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून दिव्यांगांना मदत करण्याचा पॅटर्न सुरू केला असून यामुळे दिव्यांगांना लाभ झालेला आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आपल्या भाषणातून म्हणाले की, गेल्या 3 वर्षांपासून आपण वाढदिवस साजरा केला नव्हता. मात्र यंदा कोरोनाची आपत्ती कमी झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. गेल्या 5-6 वर्षांपासून आपण आमदार निधीतून दिव्यांगांना साहित्य वाटप करत आहोत. समाजातील शोषीत घटकाला मदत करण्याला आपण कायम प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने दरवर्षी वाढदिवसाला मतदारसंघात आपण स्वखर्चाने एक लाख। वह्यांचे वाटप करत असतो. यंदा यात वाढ करून सव्वा लाख  वह्यांचे गावोगावच्या शाळांमध्ये जाऊन वाटप करणार आहोत. तसेच अनेक मुलांकडे चप्पल वा बुट नसल्याने त्यांना अनेक अडचणी निर्माण होत असतात. यामुळे यंदा सर्वेक्षण करून विद्यार्थ्यांना चपला आणि बूट प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केली. आपल्या वाढदिवसानिमित्त अशाच प्रकारे समाज उपयोगी उपक्रम आयोजीत करण्यात आल्याचे नमूद करत आपण शेवटच्या श्‍वासापर्यंत समाजातील सर्व घटकांची अविरत सेवा करत राहू असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदराव गोसावी यांनी तर आभार  उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर यांनी मानले.

धरणगावात 35 चौक सुशोभीकरणाच्या कामांना प्रारंभ

दरम्यान, यासोबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहरातील प्रमुख चौकांच्या सुशोभीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून २ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यात शहरातील ३५ चौकांचे तैलचित्रांसह सुशोभीकरण करण्यात येत आहे. यात प्रत्येक चौकात सुशोभीकरणासह पाण्याचे तुषार, पेव्हर ब्लॉक, पाईप रेलींग, सार्वजनीक शौचालय आदी कामांचा समावेश आहे. भगवान महाजन यांच्या ज्ञानेश्‍वरी कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम घेतले असून यातील 35 पैकी 6 चौकांचे सुशोभीकरण पूर्ण झालेले आहे. यातील संत  सावता माळी व संत तुकाराम महाराज चौक, हिंगलाजमाता चौक आणि श्री संताजी चौक या 3 चौकांच्या तैलचित्रासह सुशोभीकरणाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

उर्वरित चौकांच्या सुशोभीकरणाची कामे देखील तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. यात कोट बाजारातील पेव्हर ब्लॉकचे काम पूर्णत्वाकडे आले असून उर्वरित कामे सुरू आहेत. यावेळी प्रत्येक चौकात पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ   मान्यवरांचे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात अली व सत्कार करण्यात आला.

 

Protected Content