Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नगरदेवळा येथे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  दैनंदिन जीवनात मुलींना, विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या समस्यांशी दोन हात करण्यासाठी आवश्यक असणारे धैर्य त्यांच्यात निर्माण करण्यासाठी आणि शारीरिक मानसिकदृष्ट्या त्यांना खंबीर करण्याच्या उद्देशाने पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील ए. टी. गुजराथी कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम असले पाहिजे, याउद्देशाने शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या अभिलाषा रोकडे यांनी हा उपक्रम शिवजयंती निमित्ताने तालुक्यातील काही शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. समाजामध्ये महिला अत्याचारांच्या घटनांत वाढ होत आहे. घटना घडल्यानंतर पोषाख, रात्री-अपरात्रीच्या पार्ट्यांकडे बोट दाखवत मुलींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. म्हणूनच अशा कठीण प्रसंगी मुलींना आपले संरक्षण करता यावे, यासाठीच खास तरुणी आणि विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मांडताना अभिलाषा रोकडे यांनी आजच्या युगात महिलांना स्वसंरक्षण किती गरजेचे आहे हे उदाहरणा सहित पटवून दिले. तसेच कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका सी .टी. शेलार यांनी त्यांचा सत्कार केला. यानंतर संदीप मनोरे, स्वप्निल पाटील, अभिजित सोळंखे, ऋषिकेश पाटील यांनी विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे प्रात्यक्षिकासह करून दाखविले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. एस. पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीयुत वानखेडे यांनी मानले.

 

Exit mobile version