Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाशकात रंगले दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य व कवी संमेलन

WhatsApp Image 2019 06 07 at 12.53.48 PM

जळगाव ( प्रतिनिधी) शिक्षकच समाजात खऱ्या अर्थाने चांगला बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे शिक्षकाला साहित्याची जाण असणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.

नाशिक येथे औरंगाबाद येथील जीवन गौरव संस्था व महाराष्ट्र राज्य व रामशेज हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनानिमित्त दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य व कवी संमेलन झाले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी उत्तम कांबळे हे होते. विचारमंचावर शिक्षक आमदार किशोर दराडे, स्वागताध्यक्ष शिवराम बोडखे, माजी संमेलनाध्यक्ष राजन लाखे, पुणे येथील डी. बी. शिंदे, जीवन गौरवचे संस्थापक रामदास वाघमारे, कल्याण अन्नपुर्णे, संदिप सोनवणे, वंदना सलवदे, रूपाली बोडके, वैशाली भामरे, सरपंच जिजाबाई तांदळे, जळगाव जिल्ह्य़ास राज्यातील साहित्यिक, कवी, शिक्षक उपस्थित होते.

संमेलन अध्यक्ष उत्तम कांबळे पुढे बोलताना म्हणाले की, साहित्य हे माणसाला घडवत असते. जीवन सुंदर करण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्फूर्ती देत असते. जुने साहित्य हे परंपरावादी असून ते मानवी जीवनात हवे तेवढे बदल करण्यास कारणीभूत ठरत नाही. ते साहित्य धर्म, जात, कर्मकांड, अंधश्रद्धा, रुढीपंरपरा, यामध्येच अडकले होते. स्वातंत्र्यानंतर फार बदल झाले. लोकशाही मूल्य आली. त्यामुळे समाजात फार बदल झाले. त्या साहित्यात माणुस केंद्रस्थानी आणला. माणसाला महत्व दिले. शिक्षक सतत जागरूक असला पाहिजे. तोच खऱ्या अर्थाने समाजात बदल घडवून आणू शकतो. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. उद्घाटनानंतर प्रा. डॉ. सतीश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात डॉ. रत्ना चौधरी, वेच्या गावित व भाऊसाहेब चासकर आदि उपस्थित होते.  त्यानंतर मुख्य सभामंडपात हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अनेक कविंनी कविता सादर केल्या. या वेळी मीरा वाघमारे, संदीप सोनवणे, संतोष दातीर, कुणाल पवार, प्रा. अशोक डोळस, गीता केदारे आदिंनी मार्गदर्शन केले. तर दुस-या हॉलमध्ये कविकट्टा डी. बी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याध्येही महाराष्ट्रातून आलेल्या विविध कविंनी कविता सादर केल्या. यासाठी दीपक अमोलिक, योगिनी कोठेकर, सीमा गांधी आदिंनी मदत केली. संमेलनस्थळी पुस्तकाचे विविध स्टॉल खास आकर्षण ठरले. प्रा.सतिश म्हस्के व संदिप ढाकणे यांनी सुत्रसंचलन केले. संमेलन आयोजक रुपाली बोडके यांनी आभार मानले.

नंदुरबारला होणार तीसरे राज्यस्तरीय जीवन गौरव साहित्य संमेलन
२०२० मध्ये घेण्यात येणारे तिसरे जीवन गौरव राज्यस्तरीय साहित्य संमेलन नंदुरबार येथे घेण्याचे ठरले आहे. हे संमेलन व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी नंदुरबार येथील दिनेश वाडेकर व पिंपळनेर येथील प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी घेतली आहे. नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात फिरता चषक दिनेश वाडेकर व प्रा. डॉ. सतीश मस्के यांना संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, रामदास वाघमारे, हरिदास कोष्टी, रूपाली बोडखे, वैशाली भामरे, संतोष दातीर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन घेण्यात येणार आहे. यामध्ये नंदुरबार वासियांना यामध्ये सहभागी होता येईल.

Exit mobile version