Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिवाळीनंतर शाळा सुरू कराव्यात- मुख्यमंत्री

मुंबई । विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. 

या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदि उपस्थित होते. जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारतां येत नाही. दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ज्या शाळांमध्ये क्वारंटाइन सेंटर्स तयार करण्यात आले होते ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जी मुलं आजारी आहेत किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आर. टी. पी. सी. आर. चाचणी ही १७ ते २२ नोव्हेंबर या दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. दि.२३ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.  एका बेंचवर एका बेंचवर बसविण्यात येईल एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाइन वर्गांची सुविधा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा सुरू करतांना टप्प्या टप्प्याने शाळा सुरू कराव्या तसेच शाळा व्यवस्थित सुरू रहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एस ओ पी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्या टप्प्यांने शाळा सुरू करण्यात येतील असे अप्पर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनी सांगितले.

 

Exit mobile version