Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत खडसे समर्थक सहभागी होणार का ? : सावदेकरांचे लागले लक्ष !

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी | येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत एकनाथराव खडसे समर्थक सहभागी होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रवींद्रभैय्या पाटील व रोहिणी खडसे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्यानेही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आज दुपारी चार वाजता जेहरा मॅरेज हॉल येथे आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत ना.अजितदादा पवार यांच्या आगामी संपर्क दौर्‍याबाबात विचार विनिमय करणे. शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्तेचा पक्ष प्रवेश व सत्कार.पक्ष कार्यकरणीचा आढावा आणि शहरात शाखा उदघाटन बाबतचे कार्यक्रम ठरविणे यावर चर्चा होणार आहे.

तसं म्हटलं तर कोणत्याही राजकीय पक्षाची आढावा बैठक या नित्य राजकीय कार्यक्रमांचाच एक भाग आहे. तथापि, आजची बैठक ही अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. एक तर येथील पालिकेतील भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या मात्र आता खडसे कुटुंबासोबत उघड फिरणारे पदाधिकारी हे या आढावा बैठकीत सहभागी होणार का ? याबाबत सावदेकरांना उत्सुकता लागली आहे. कारण आजची आढावा बैठक ही महत्वाची असून यात थेट उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे याबाबत उत्सुकता लागली आहे.

या बैठकीतील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे हे या आढावा बैठकीला संबोधित करणार आहेत. रवींद्रभैय्यांनी दोन दिवसांआधीच आपल्या जिल्हा बँक संचालकपदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे. जिल्हा बँकेत काम होत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. आता, काम होत नाही म्हणजे थेट अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याकडेच त्यांचा अंगुलीनिर्देश आहे. याचा विचार करता राजीनामा देणारे रवींद्रभैय्या आणि त्यांनी अप्रत्यक्ष ज्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केल्या त्या रोहिणीताई या दोन्ही नेत्यांना एकाच व्यासपीठावरून बोलतांना पाहणे हे देखील राजकीय अभ्यासकांना मनोरंजक ठरणार आहे. यामुळे सावदा येथील राष्ट्रवादीची आजची बैठक ही झोतात आलेली आहे.

Exit mobile version