बोगस भरती : एकाला न्यायालयीन कोठडी, इतरांचा पत्ता लागेना !

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो-उर्दू स्कूलमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणातील संशयिताला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर अनेक हाय-प्रोफाईल संशयितांचा अजून देखील पत्ता लागत नसल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.

येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत बोगस शिक्षक भरती करण्यात आल्या प्रकरणी संस्था चालकांसह तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शे.सुपडू शे.रशीद मंसुरी, शे.हनीफ शे.रशीद मंसुरी, सगिर दगडू बागवान, मुक्तार अली कादरअली, लुकमान खान गुलशेर खान, शे.रफिक शे.गुलाब, दानिश सगिर बागवान, शेख सलीम अहमद शे.सुपडू पिंजारी, शे.जब्बार सलीम कुरेशी, तत्कालीन शिक्षण अधिकारी माध्यमिक भास्कर जे.पाटील, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी देवांग (पूर्ण नाव माहीत नाही); सगीर दगडू बागवान (मयत), मुख्तारअली कादरअली व लुकमान खान गुलशेर खान आदींचा संशयितांमध्ये समावेश आहे.

दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित आरोपी शे.हनीफ शे.रशीद मंसुरी यांना पोलिसांनी अटक करून रावेर न्यायालयासमोर हजर केले होते. यात न्यायमूर्तींनी संशयिताला १३ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यानंतर त्यांना काल पुन्हा न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची जळगावच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकार्‍यांसह इतर बड्या मंडळीचा समावेश असून त्यांना अद्याप अटक करण्यात न आल्याने एकच चर्चा रंगली आहे.

या गुन्ह्याचा तपास सपोनि डी.डी. इंगोले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय समाधान गायकवाड करत आहेत. या तपासाकडे शहरासह परिसराचे लक्ष लागून आहे.

Protected Content