Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : सुकी नदीपात्रात २२ मृत बैल ! परिसरात खळबळ

सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी | एकीकडे लंपीमुळे गुरांवर मोठे सावट आलेले असतांनाच सुकी नदीच्या पात्रात आज सकाळी मेलेले २२ बैल आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, रावेर तालुक्यात लंपीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला आहे. यात अनेक गुरांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, एकीकडे प्रशासन लंपीबाबत सतर्कतेचा इशारा देत असतांना आज सकाळी सुकी नदीच्या पात्रात मृत बैल आढळून आले.

आज सकाळी सुकी नदीच्या पुलावरून नदीच्या पात्रात २२ बैल मृत अवस्थेत फेकून देल्याचे दिसून आले आहे. प्रथमदर्शनी पाहता पुलावरील एखाद्या वाहनातून त्यांना खाली पात्रात फेकून दिले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हे बैल लंपीमुळे मृत झाले की, अन्य कारणाने ? याची माहिती अद्याप कळलेली नाही. या मार्गावरून गुरांची आंतरराज्यीय तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. यातील एखाद्या वाहनात गुरे गुदमरून मेली असल्याने त्यांना नदीपात्रात टाकले असावे का ? अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे. कारण, यातील काही गुरांच्या गळ्याला दोराचा फास लागल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सकाळी ही माहिती मिळताच चिनावल येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सरोदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली असून पशुवैद्यकीय अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूज आपल्याला लवकरच सविस्तर वृत्त देणार आहे.

Exit mobile version