Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे देवा : आता गुरांचेही लॉकडाऊन, प्रशासनाचे निर्देश जारी !

सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी ( स्पेशल रिपोर्ट ) | कोरोना काळातील लॉकडाऊनच्या भयावह आठवणी आपल्याला नकोशा वाटतात. मात्र आता मानवातील कोविड प्रमाणेच गुरांसाठी लंपी डिसीज या साथरोगामुळे लॉकडाऊन सारखेच नियम लागू करण्यात आले आहेत.

सध्या सर्वत्र लंपी डिसीजमुळे गुरांना वेगाने संसर्ग होऊ लागला आहे. हा गुरांचा एक त्वचेचा विचार करून त्याचा अतिशय वेगाने संसर्ग होत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कालच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एक परिपत्रक काढून रावेर तालुक्यातील एका भागासाठी सतर्कतेचे निर्देश जारी केले आहेत.

यात नमूद केले आहे की, सावदा, चिनावल, रसलपूर, विवरा आणि रोझोदा या पाच गावांपासून १० किलोमीटर इतके क्षेत्र इन्फेक्टेट झोन म्हणजेच बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत आहे. या परिसरातील सर्व गुरांचे गोठे/शेड यांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. यासोबत गुरांची खरेदी-विक्री, प्रदर्शन, जत्रा, वाहतूक आदींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. बाधीत क्षेत्रातील प्रत्येक गुराचे गोट पॉक्स या लसीच्या माध्यमातून लसीकरण करण्याचे निर्देश देखील यात देण्यात आलेले आहे.

तालुक्यातील पाच बाधीत क्षेत्रांसाठी शीघ्र कृती दलाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. यात सावदा परिसरात पशुसंवर्धन खात्याचे सहायक आयुक्त डॉ. संजय धांडे व सावद्याचे पशुसंवर्धन अधिकारी निलेश राजपूत यांनी लसीकरण केले. यासोबत उद्यापासून पाच दिवसांपर्यंत स्पेशल पाच चमूंचे गठन करण्यात आले असून यात डॉ. निलेश राजपूत यांच्या जोडीला आसाराम बारेला व विजय चौधरी; डॉ. प्रवीण धांडे यांच्या जोडीला प्रशांत खाचणे व तडवी; डॉ. रणजीत पाटील यांच्या जोडीला तुषार पाटील; डॉ. प्रदीप काळे यांच्या जोडीला गजानन खेकाटे, रामकृष्ण बारी, तडवी तर डॉ. अभिजीत डावरे यांच्या जोडीला सुधाकर शेळके, नेमाडे आणि इंगळे आदी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सावदा येथे दर रविवारी गुरांचा बाजार भरतो. आता प्रशासनाच्या निर्देशामुळे उद्या भरणारा बाजार देखील बंद ठेवण्यात येणार आहे. एका अर्थाने, कोरोनाच्या काळात मानवांसाठी जसे लॉकडाऊन लागले होते, अगदी त्याच प्रकारे लंपी डिसीजमुळे गुरांसाठी देखील लॉकडाऊन लावण्याचे निर्देश प्रशासनाने दिल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version