Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केळी व्यापारी व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमधील वाद संपुष्टात

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | येथील केळी व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतुकीच्या दराच्या वादावर आज बैठक होऊन तोडगा काढण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, सावदा हे केळी व्यापार आणि ट्रान्सपोर्ट या दोन्ही क्षेत्रांचे मोठे केंद्र आहे. अर्थात केळी खरेदी करणारा व्यापारी आणि माल वाहतूकदार हे एकमेकांसाठी अविभाज्य घटक असल्याने त्यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून माल वाहतुकीच्या दरावरून व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज सावदा येथे व्यापारी आणि माल वाहतुकदारांची बैठक आयोजीत करण्यात आली.

दिल्ली, हरियाणा आदी ठिकाणच्या ट्रान्सपोर्टर्सनी ज्यांचा माल त्यांचाच हमाल हे धोरण अंमलात आणले आहे. मात्र सावदा येथील व्यापारी आणि माल वाहतूकदार हे असंघटीत असल्यामुळे येथे हे धोरण अशक्य असल्याने यासाठी सामोपचाराचा मार्ग स्वीकारण्यात आला. यात सहा आणि दहा चाकी ट्रकसाठी दोन हजार तर बारा चाकीसाठी अडीच हजार रूपये हमाली घेण्यात यावी असे ठरले. तर स्थानीक पातळीवरील हमाली ही १३० रूपये प्रति टन इतकी कायम राखण्यात यावी असा निर्णय या बैठकीत ठरला. या माध्यमातून माल वाहतूकदार आणि केळी व्यापार्‍यांनी समन्वयाची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version