सावकारी पाश : पाच शेतकर्‍यांच्या निर्णयावर होणार पुनर्विचार तर दहा शेतकर्‍यांना दिलासा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ( Exclusive Report) | सावदा परिसरातील सावकाराच्या पाशातून मुक्त केलेले जमीन प्रकरण कोर्टात गेले असता यातील दहा शेतकर्‍यांना ‘जैसे थे’ असे निर्णय देऊन दिलासा मिळाला आहे तर पाच जणांच्या निर्णयावर मात्र पुनर्विचार करावा असा निकाल देण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, रावेर तालुक्यातील सावदा येथील नंदकुमार मुकुंदा पाटील याच्यासह मुरलीधर तोताराम भोळे, मुरलीधर काशीनाथ राणे, सुदाम तुकाराम राणे, मधुकर तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी, मुरलीधर सुदाम राणे या आठ अवैध सावकारांनी कर्जाच्या व्याजापोटी दस्त नोंदवून शेतकर्‍यांच्या जमीनी बळकावल्याच्या तक्रारी सहकार खात्याकडे करण्यात आल्या होत्या.

या प्रकरणी उपनिबंधक संतोष बिडवई यांनी संबंधीत शेतकर्‍यांच्या तक्रारी दाखल करून यावर तब्बल ४७ वेळेस सुनावणी घेतली होती. यानंतर २४ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १८ (२) आणि कलम १७ (५) नुसार तब्बल ३८ हे. ३७.५८८ आर शेती पीडित १६ शेतकर्‍यांना परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिले होते. यात रावेर येथील २८ प्लॉटवर घरे बांधण्यात आल्याने त्याचे मूल्यांकन करून तब्बल पावणेदोन कोटी रुपयेही सावकाराला परत द्यावे लागणार असल्याचा निकाल त्यांनी दिला होता.

या शेतकर्‍यांना मिळाल्या होत्या जमिनी
या प्रकरणी उपनिबंधक संतोष बिडवई यांनी रतिराम देवचंद पाटील (कोचूर, ता. रावेर), सुनील अर्जुन जावळे (कुसुंबे, ता. रावेर), उषाबाई टोपा जंगले (कुंभारखेडा), मंदाबाई मनोहर पाटील (कुंभारखेडा), पुंडलिक नथ्थू चौधरी (रा. उदळी खुर्द, रावेर), रमेश भास्कर पाटील (हंबर्डी, ता. यावल), रमेश लक्ष्मण चौधरी व नीलेश रमेश चौधरी (अट्रावल), सुरेश पाव्हणू फेगडे यांचे वारस चंदकुमार सुरेश फेगडे (उदळी, ता. रावेर), नीलेश धनसिंग पाटील (दुसखेडा, ता. यावल), भारती अनिल परदेशी (कोचूर बुद्रुक), लक्ष्मण बुधो ढिवर (उदळी, बुद्रुक), सोपान शामराव पाटील (उदळी बुद्रुक), ज्ञानदेव देवराम महाजन (उदळी खुर्द), श्रीकृष्ण दामू पाटील (उदळी बुद्रुक), रवींद्र भागवत जावळे (फैजपूर); लक्ष्मण बुधो सुरळके ( रा. उदळी, ता. रावेर ) या शेतकर्‍यांना जमीनी परत देण्याचे आदेश दिले होते.

या शेतकर्‍यांना उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या उपस्थितीत जमीनी परत करण्यात आल्या होत्या. त्यांच्या नावावर पुन्हा सात-बारा उतार्‍यावर नाव देखील लागले होते. अशा स्वरूपाचा हा राज्यातील पहिलाच निकाल असल्याने संपूर्ण राज्यात याला व्यापक प्रसिध्दी देखील मिळाली होती.

या पाच शेतकर्‍यांना जमीन परत देण्याच्या निर्णयावर पुनर्विचार
या निकालाच्या विरोधात नंदकुमार पाटील आणि इतरांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक विभाग यांच्याकडे दाद मागितली होती. यावर सुनावणी होऊन नुकताच याचा निकाल लागला आहे. याच्या अंतर्गत पुंडलिक नथ्थू चौधरी (रा. उदळी खुर्द, रावेर), रमेश भास्कर पाटील (हंबर्डी, ता. यावल), भारती अनिल परदेशी ( रा. कोचूर, ता. रावेर); रमेश लक्ष्मण चौधरी ( अट्रावल, ता. यावल) आणि नीलेश धनसिंग पाटील (दुसखेडा, ता. यावल) या पाच शेतकर्‍यांना जमीन परत देण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी जिल्हा उपनिबंधकांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच लक्ष्मण बुधो सुरळके ( रा. उदळी, ता. रावेर ) यांच्याबाबत कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेण्यात आलेला नाही.

दहा शेतकर्‍यांना मात्र दिलासा
तर उर्वरित सुरेश पाव्हणू फेगडे यांचे वारस चंदनकुमार सुरेश फेगडे (उदळी, ता. रावेर), रतिराम देवचंद पाटील (रा. कोचूर, ता. रावेर ); सुनील अर्जुन जावळे ( चिनावल, ता. रावेर ); श्रीमती उषाबाई टोपा जंगले; मंदाबाई मनोहर पाटील ( दोन्ही रा. कुंभारखेडा, ता. रावेर); सोपान शामराव पाटील (रा. रावेर); ज्ञानदेव देवराम महाजन ( रा. उदळी); श्रीकृष्ण दामू पाटील ( रा. उदळी) ; रवींद्र भागवत जावळे (रा. फैजपूर) आणि लोटू गणपत पाटील ( रा. उदळी, ता. रावेर) या दहा शेतकर्‍यांना मात्र दिलासा मिळाला आहे. या शेतकर्‍यांबाबत जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिलेला आदेश कायम ठेवण्यात आलेला आहे.

Protected Content