Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावद्याच्या सौरभ महाजनची भरारी; प्रवेश परिक्षेत देशातून पहिला !

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | येथील सौरभ कमलाकर महाजन हा विद्यार्थी सीडॅकच्या प्रवेश परिक्षेत (सीसीएटी) संपूर्ण देशातून प्रथम आला असून त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

याबाबत वृत्त असे की, सौरभ कमलाकर महाजन या विद्यार्थ्याने आज देदीप्यमान यश संपादन केले आहे. सीडॅक या संस्थेतील अभ्यासक्रमासाठी सीसीएटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यात साधारणपणे देशभरातून पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी परीक्षा देत असतात. या परिक्षेचा निकाल लागला असून यात सौरभ महाजन याने देशातून पहिला क्रमांक संपादन केला आहे. त्याचे सातवी पर्यंचे शिक्षण डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये झाले आहे. यानंतर त्याने भारती विद्यापीठातून डिप्लोमा तर सिंहगड इन्स्टीट्युटमधून बी.ई. केले आहे. यानंतर आता तो सीडॅक संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे.

 

वडील कमलाकर महाजन, आई कोमल महाजन, आजोबा सुरेश जीवराम चौधरी आणि दोन्ही मामा यांच्या आशिर्वादाने आणि सहकार्याने आपण यश संपादन केल्याची भावना सौरभ महाजन याने व्यक्त केली आहे. या यशाबद्दल त्याचे माजी आमदार रमेशदादा चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राष्ट्रवादीचे गटनेते फिरोजखान पठाण, माजी नगरसेवक सुधाकर पाटील, सुनील पाटील यांच्यासह गांधी चौक मित्रमंडळाने त्याचे कौतुक केले आहे. तर समाजाच्या सर्व स्तरांमधून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version