भुसावळात सपशेल फसला बंद ! : महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव

भुसावळ प्रतिनिधी | राज्यातील महाविकास आघाडी सरकारतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला भुसावळ शहरात अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. तिन्ही घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने इतर शहरांमध्ये पदाधिकारी रस्त्यावर उतरले असतांना येथे मात्र असे काहीही आढळून आले नाही.

याबाबत वृत्त असे की, उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पाळण्यात येत आहे.  या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांसह भाजपविरोधातील सर्वच पक्ष, संस्थांसह विविध कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बंद परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी शेतकर्‍यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने केले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक शहरात तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे रस्त्यावर उतरून व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र भुसावळात असे काहीही घडले नाही.

भुसावळ शहरात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी दुपारी दीड वाजेपर्यंत कुणीही व्यापार्‍यांना आवाहन केले नव्हते. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकार्‍याला याबाबत विचारणा केली असता त्यांनी शहरातील व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितल्याने आम्ही त्यांना आवाहन केले नसल्याची माहिती दिली.

यामुळे भुसावळ शहरातील संपूर्ण बाजारपेठ ही आज देखील नियमीतपणे उघडी असल्याचे दिसून आले. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासोबत इतर सर्व संकुले, दुकाने, हातगाड्यांवरील किरकोळ व्यावसायिक हे सर्व नेहमीप्रमाणेच व्यवसाय करतांना आढळून आले. यामुळे येथे बंद सपशेल फसल्याचे स्पष्ट झाले

Protected Content