Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संजय राऊतांचा तुरूंगातला मुक्काम वाढला : ५ सप्टेंबरला पुढील सुनावणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार संजय राऊत यांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून त्यांच्या अर्जावर ५ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत हे सध्या कारागृहात आहेत. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांना एक ऑगस्टला नऊ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. त्यानंतर दोन वेळा जामीन नाकारत ईडीने त्यांची कोठडी कायम ठेवली. त्यामुळे आज पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर ५ सप्टेंबरपर्यंत त्यांची कोठडी कायम ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे राऊतांचा तुरूंगातील मुक्काम वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा आहे. ईडीच्या आरोपानुसार, गोरेगावातल्या पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. प्रवीण राऊतांची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला. पुनर्विकासासाठी ही जागा राऊतांच्या कंपनीला दिली होती. मात्र त्याचा काहीच पुनर्विकास झाला नाही, उलट या जागी बांधलेली घरं काही व्यावसायिकांना वाटून देण्यात आली आणि त्यातून राऊतांनी तब्बल १,०७४ कोटी रुपये जमावले असल्याचा ईडीचा आरोप आहे. यानंतर प्रवीण राऊतांनी यातले ८३ लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतल्याचा आरोप केला आहे.

Exit mobile version