Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर देशातील राज्ये फुटतील : संजय राऊतांचा इशारा

मुंबई प्रतिनिधी । विरोधी पक्षांची सरकारे असणार्‍या राज्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याने रशियाप्रमाणे भारतातील राज्ये देखील फुटतील असा गंभीर इशारा खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दैनिक सामनातील रोखठोक या आपल्या साप्ताहिक स्तंभामध्ये संजय राऊत यांनी वर्षभराचा हिशोब मांडत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, लोकशाहीत राजकीय पराभव होतच असतात, पण ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून घालविण्यासाठी केंद्रीय सत्ता ज्या पद्धतीने वापरली जात आहे ते धक्कादायक आहे. प्रचंड गर्दीचे मेळावे व रोड शो सुरू आहेत व देशाचे गृहमंत्री त्याचे नेतृत्व करीत आहेत. त्याचवेळी कोरोनासंदर्भातील गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करावी लागते. नियम मोडणारे राज्यकर्तेच असतात व भुर्दंड जनतेला, असाच हा प्रकार आहे.

यात पुढे म्हटले आहे की, मावळत्या वर्षाने महागाई, बेरोजगारी, आर्थिक डबघाई, निराशा, वैफल्याचे ओझे उगवत्या वर्षावर टाकले आहे. सरकारकडे पैसा नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहेत. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवे. राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधान विशेष रस घेत असतील तर कसे व्हायचे? पंतप्रधान देशाचे आहेत. संघराज्य बनून देश उभा आहे. ज्या राज्यांत भाजपची सरकारे नाहीत ती राज्येही राष्ट्राशीच नाते सांगतात, हा विचार मारला जात आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेस फोडून भाजपने सरकार बनवलं. बिहारात तेजस्वी यादव या तरुणाने आव्हान उभे केले. कश्मीर खोर्‍यात अस्थिरता कायम आहे. लडाखमध्ये चीन घुसलेलाच आहे. पंजाबच्या शेतकर्‍यांवर जोरजबरदस्तीचे प्रयोग सुरू आहेत. पंगना राणावत व अर्णब गोस्वामीला वाचविण्यासाठी केंद्रीय सरकार जमिनीवर उतरले. मुंबईची ङ्गमेट्रोफ राजकीय अहंकारासाठी अडवून ठेवली. राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही असा इशारा यात दिला आहे.

दरम्यान, कोरोना आणि लॉक डाऊन असले तरी सर्व स्तरांवरील भ्रष्टाचाराचा विषाणू कायम आहे. अंबानी, अदानी यांची संपत्ती मावळत्या वर्षातही वाढत गेली, पण जनतेने मोठ्या प्रमाणात नोकर्‍या गमावल्या. त्यामुळे नवीन वर्षाचे आगमन नोकरदारांना काय देणार? आता नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झालं ते पुरे झाले. मानसिक अस्थिरता, अशांतता यांनी भरलेलं २०२० हे वर्ष फार वेगाने संपले आणि मावळत्या वर्षाने काही चांगलं पेरून न ठेवल्यामुळे येणारे २०२१ हे वर्ष नक्की कसे जाईल, त्याचा भरवसा नाही. लोकांनी स्वतःचे कुटुंब वाचवायचा प्रयत्न करावा. बाकी जग सुरूच राहणार आहे! असे यात शेवटी म्हटले आहे.

Exit mobile version