भावनेचा कडेलोट अन् कायद्याचे वस्त्रहरण झालेय ! : संजय राऊत

मुंबई । ”एका नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज आता एका बेटीवर बलात्कार होऊन शांत का ?” असा खडा सवाल करत आज शिवसेनेचे खासदार तथा मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी हाथरस प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

खासदार संजय राऊत यांनी आज आपल्या सामनातील रोखठोक या स्तंभातून हाथरस येथील प्रकरणावर भाष्य केले आहे. यात म्हटले आहे की, मनीषा वाल्मीकी कोण? तिचे काय झाले? हे आता निदान अर्ध्या जगाला कळले आहे. मुंबईत एका नटीचे बेकायदेशीर बांधलेले ऑफिस तोडले म्हणून ज्यांना न्याय, अन्याय, महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागल्या ते सर्व लोक मनीषाच्या बेकायदेशीर पेटवलेल्या चितेबाबत थंड आहेत. मनीषाला न्याय मिळावा म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच ‘काय हा अन्याय?’ असे बोंबलणारा मीडियादेखील कंठशोष करताना दिसला नाही. का? असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.

यात पुढे म्हटले की, अशा घटना अधूनमधून पाकिस्तानात घडत असतात. हिंदूंच्या मुलींना जबरदस्तीने पळवून, बलात्कार करून त्यांना मारून फेकले जाते. हाथरसला वेगळे काय घडले? पण हाथरसला कुणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही! उत्तर प्रदेशात रामराज्य आहेच. तेथे आता एक हजार एकरवर फिल्मसिटी उभारली जात आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील अनेक राण्या-महाराण्या यापुढे लखनौ, कानपूरलाच मुक्कामास जातील. यापैकी एखाद्या राणीने योगीराजला पाकिस्तान किंवा जंगलराजची उपमा दिली तरी तेथले भाजप कार्यकर्ते संयमाने घेतील व एखाद्या राणीचे बेकायदेशीर बांधकाम तोडायला सरकारी फौजफाटा पाठवणार नाहीत. कारण महिलांचा सन्मान आणि सुरक्षा हा विषय महत्त्वाचा. पण हाथरससारख्या निर्घृण प्रकरणानंतरही सरकारने हाच संयम दाखवला. त्या पीडितेला मरू दिले. रामराज्यात जणू एक सीतामाईच तडफडून मरण पावली.

महिलांना न्याय त्यांचे समाजातील स्थान पाहून मिळतो काय? देशातल्या मीडियावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे हे प्रकरण आहे. कंगना प्रकरणात महिनाभर संपूर्ण मीडियास न्याय द्या या प्रेरणेने पछाडले होते. वृत्तवाहिन्यांवर दुसरा कोणताच विषय नव्हता. पण हेच कोकलणारे लोक हाथरस प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाला, केंद्र सरकारला, योगी सरकारला प्रश्‍न विचारताना दिसत नाहीत. रामदास आठवले हे सध्या विनोदाचा विषय ठरत आहेत. ते कंगना राणावतला घरी जाऊन भेटले व त्यांचे कार्यकर्ते आधी विमानतळावर तिच्या स्वागतासाठी पोहोचले, पायल घोष या नटीस घेऊन ते राज्यपालांना भेटले. मात्र हाथरसची एक दलित कन्या मृत्यूशी झुंज देत होती, तिच्यावर अत्याचार झाला; तेव्हा आयुष्यमान आठवले नट्यांच्या घोळक्यात भलतेच उद्योग करीत होते असा टोला राऊत यांनी मारला आहे.

दरम्यान, एका निर्भयासाठी कधीकाळी देश रस्त्यावर उतरला होता हे इतक्या लवकर मोदींचे सरकार विसरून गेले. २०१४ ते २०१९ या काळात १२,२५७ गँगरेप उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश या चार राज्यांत झाले आहेत, पण जात, धर्म, राजकीय प्रतिष्ठा पाहून अशा प्रकरणांत न्याय केला जातो. एका नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. भावनेचा कडेलोट आणि कायद्याचे वस्त्रहरण झाले असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले आहे.

Protected Content