Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईच्या बिल्डर्सकडून ईडीची वसुली : संजय राऊत यांचा घणाघाती आरोप

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असून ईडीचे अधिकारी हे भाजप नेत्यांसोबत वसुली करत आहेत. त्यांनी मुंबईतल्या बिल्डर्सकडून शेकडो कोटींची खंडणी वसूल केल्याचा गंभीर आरोप आज शिवसेनेचे खासदार तथा मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. पीएमसी घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाचा समावेश असून त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करत भाजपवर घणाघाती टीका केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना दिनांक १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत महत्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेत ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. भाजपच्या साडेतीन नेत्यांना आम्ही तुरूंगात टाकू असं म्हटलं होतं. त्यामुळे आता हे साडेतीन नेते कोण? याबाबत चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, आज सकाळपासून शिवसेना भवनात खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची तयारी सुरू करण्यात आली होती. तर मुंबईसह राज्यातल्या विविध भागांमधून शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवसेना भवन परिसरात दाखल झाले. याप्रसंगी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून खासदार संजय राऊत यांना पाठींबा व्यक्त केला. दरम्यान, पत्रकार परिषदेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, अरविंद सामंत, मंत्री उदय सामंत, अनिल देसाई, आदेश बांदेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती होती.

खासदार संजय राऊत यांनी सायंकाळी चारच्या सुमारास पत्रकार परिषद सुरू केली. ते म्हणाले की, आज सकाळपासून महाविकास आघाडीतील सर्व महत्वाच्या नेत्यांनी माझ्याशी वार्तालाप करून या लढ्याला पाठींबा दिला. बाळासाहेब ठाकरे म्हणत असत की, आपण काही वावगे केले नसले तर कुणालाही घाबरू नका. महाराष्ट्र गांडूची औलाद नाही हे दाखविण्यासाठी आजची पत्रकार परिषद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना छळले जात आहे. राज्यातील सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

राऊत पुढे म्हणाले की, सुमारे २० दिवसांपूर्वी भाजपचे काही प्रमुख लोक मला तीनदा भेटले. त्यांनी मला या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा असे सांगितले. काहीही करून आम्ही हे सरकार पाडू. तुम्ही आम्हाला मदत करा अशी विनंती त्यांनी केली. जर यासाठी आम्हाला मदत केली नाही तर तुम्हाला तपास यंत्रणा टाईट करतील अशी धमकी देखील त्यांनी दिली. शरद पवार यांना सुध्दा याच प्रकारे त्रास देण्याचे काम सुरू झाले. माझ्या कुटुंब आणि मित्रांच्या घरांवर धाडी पडू लागल्या. यातून मुलूंडचा दलाल चुकीचे आरोप करत असल्याचा घणाघाती आरोप राऊत यांनी केला. याच सोमय्या यांनी मराठी भाषेच्या विरूध्द न्यायालयात खटला दाखल केल्याबद्दल त्यांनी टीका केली.

भाजप नेते म्हणतात की, आमच्याकडे १९ बंगले आहेत. मात्र पत्रकारांनी याची सत्यासत्यता तपासून घेतली असल्याचा दावा राऊत यांनी केला. अनिल परब, अनिल वायकर, आनंदराव अडसूळ, भावना गवळी आदींसारख्या शिवसेना नेत्यांच्या मागे तपास यंत्रणा मागे लागली. माझ्या अलीबाग येथील ५० गुंठे जमीनीचा तपास ईडी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तुम्ही आमच्या घरात शिरले तरी आम्ही घाबरणार नसल्याचे ते म्हणाले. गुजरातमध्ये ईडी का जात नाही ? असा सवाल देखील त्यांनी केला.

हरियाणातील एक दूधवाला हा पाच वर्षांमध्येच सात हजार कोटींचा मालक कसा झाला ? असा सवाल राऊत यांनी केला. भाजप नेत्यांशी त्याचे संबंध असून यातील साडे तीन हजार कोटी रूपये भाजप नेत्यांचे असल्याचा गंभीर आरोप केला. महाआयटीमध्ये तब्बल २५ हजार कोटी रूपयांचा घोटाळा असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. विना टेंडरने कुणाला कामे मिळाली ? याची माहिती आपण ईडीला देणार आहोत. यातील पाच हजार कोटी रूपयांचा हिशोब आपल्याकडे आला असून ती माहिती आपण सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याच्या खात्यातून भाजपला २० कोटी रूपये मिळाल्याची बाब उघड आहे. निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी ही नील किरीट सोमय्या यांची असून तो राकेश वाधवान यांचा पार्टनर असून त्यांनी वसई येथे मोठा प्रकल्प उभारला आहे. राकेश वाधवान यांच्याशी सोमय्या यांचा थेट संबंध असल्याचा आरोप राऊत यांनी केला. या घोटाळ्यात जमीन तसेच सुमारे ८० ते १०० कोटी रूपयांची कॅश घेतल्याचेही राऊत म्हणाले. वसई येथील चारशे कोटी रूपयांची जमीन फक्त चार कोटींना घेतली. येथे सर्व नियमांची पायमल्ली करून हजारो कोटींचे प्रोजेक्ट सुरू असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. यामुळे सोमय्या पिता-पुत्राला अटक करण्याची मागणी त्यांनी केली. गेल्या तीन महिन्यात हे सर्व डॉक्युमेंट तीन वेळेस ईडी कार्यालयात पाठविले असतांना काहीही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सोमय्या हे ईडीचे वसुली एजंट असल्याचे ते म्हणाले.

चार महिन्यांपासून ईडीकडून बिल्डर्सकडून वसुली होत असून जितेंद्र चंद्रलाल नवलानी, फरीद शमा आणि इतर दोघांनी २०० कोटी रूपये घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, मोहित कंबोज हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासमखास असून अनेक घोटाळ्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला. तर आपण येणार्‍या काही दिवसांमध्ये कोण फुल आणि कोण हाफ आहे हे सांगणार असल्याचे राऊत म्हणाले.

Exit mobile version