काँग्रेसचे शिवसेनेत विलीनीकरण झाले आहे का ? -संजय निरूपम

मुंबई प्रतिनिधी । माजी खासदार संजय निरूपम यांनी आज पुन्हा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर देत मुंबई काँग्रेसचे शिवसेनेत विलीनीकरण झाले आहे का ? असा प्रश्‍न विचारला आहे.

माजी खासदार संजय निरूपम हे अलीकडच्या काळात पक्षावरच टीका करत असल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी राज्यातील नेत्यांनी केली आहे. याबाबतचा अहवाल श्रेष्ठींना पाठविण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. राजस्थानात सचिन पायलट यांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर निरूपन यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आज पुन्हा एकदा स्थानिक नेत्यांना लक्ष्य केले आहे.

संजय निरुपम यांनी आज एका ट्विटमध्ये पक्षावरच टिकास्त्र सोडले आहे. यात ते म्हणाले आहेत की, शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी मी केली. शिवसेनेच्या विरोधात बोलणं पक्षविरोधी कारवाया आहेत का? मुंबई काँग्रेसचं शिवसेनेत विलिनीकरण झालंय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यासोबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरुन व्यक्त केलेल्या नाराजीवरुनही निरुपम यांनी ट्विट केले आहे. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीचा फोटो ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे असं ऐकलं ना? मग युवकांना रोजगार देणार्‍या सरकारी जाहिरातीत काँग्रेस कुठे आहे? ज्या काँग्रेस नेत्यांना शिवसेनेवर अथांग प्रेम झालं आहे. त्यांना माझे प्रश्‍न आहेत. शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्याशी लढा अन्यथा पक्ष संपून जाईल असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.

तर आणखी एका ट्विटच्या माध्यमातून पक्षाला घेरले आहे. सध्या मुंबई काँग्रेसचे कार्यालय बंद असल्या वरून देखील त्यांनी एका ट्विटमध्ये टोमणा मारला आहे. काँग्रेस कार्यालयाचे कुलूप केव्हा उघडणार ? असा उपरोधी प्रश्‍न देखील त्यांनी विचारला आहे. यामुळे आता निरूपम यांच्याबाबत पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Protected Content