Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू चोरटे जुमानण्याच्या पलीकडे : पोलीस पथकाच्या वाहनाला दिली धडक

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या महिन्यात निवासी उपजिल्ह्याधिकार्‍यांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आता फैजपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्यासह पोलिसांच्या पथकाच्या खासगी वाहनाला वाळू माफियांनी धडक दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार व त्यांच्या सहकार्‍यांवर वाळू चोरट्यांनी प्राणघातक हल्ला चढविला होता. यात ते जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, यानंतर काही दिवस वाळू माफिया थोडे सावध झाले होते. आता मात्र ते पुन्हा सैराट झाल्याचे फैजपुरात घडलेल्या घटनेतून दिसून आले आहे.

फैजपुरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांना चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. यानुसार त्या खासगी वाहनातून पोलीस कर्मचार्‍यांना सोबतीला घेऊन निघाल्या. चितोडा गावाजवळ एमएच ४० एन ६५८८ क्रमांकाचा डंपर अवैध वाळू वाहतूक करत असतांना दिसून आला. याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्या वाहनाच्या चालकाने पलायन करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर डंपर चालकाने एका बाजूने पोलीस पथकाच्या वाहनाला धडका दिल्या. यानंतर पोलिसांनी डंपरचा चालक मयूर सुरेश कोळी आणि त्याच्या सोबत असणारा प्रशांत उर्फ दादू पुरूषोत्तम पाटील यांना अटक केली. तर डंपरचा मालक ज्ञानेश्‍वर उर्फ नाना नामदेव तायडे हा मात्र फरार झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

या संदर्भात पोलीस कर्मचारी अल्ताफ अली यांनी फैजपुर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी डंपरच्या मालकाचा शोध सुरू केला आहे. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या पाठोपाठ थेट आयपीएस अधिकार्‍याच्या वाहनावरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे वाळू चोरटे हे कुणालाही जुमानण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version