Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पसंख्याक विभागांतर्गत अमळनेर मतदारसंघात तीन कोटींच्या कामांना मंजुरी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत अमळनेर शहर व ग्रामिण भागात सुमारे ३ कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, ना. अनिल पाटील हे मंत्री पदावर विराजमान झाल्यापासून अमळनेर मतदारसंघात विकास कामांसाठी निधीची ओघ सुरूच असून वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून जास्तीतजास्त निधी खेचून आणला जात आहे. यातच आता अल्पसंख्याक विभागातर्फे राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी व ग्रामिण क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान वितरित करण्यास या विभागाने नुकतीच मंजुरी दिली असून यात अमळनेर शहरात २ कोटी तर ग्रामिण भागात १ कोटींच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

ही आहेत शहरी भागातील कामे

अमळनेर नगरपरिषद हद्दीत इदगाह मैदान येथे पेव्हर ब्लॉक कॉंक्रीटीकरण करणे व सरंक्षण भिंत बांधकाम करणे,५० लक्ष; प्रभाग १७ मध्ये शाह आलम नगर येथें गटारी व रस्ते ट्रीमिक्स कॉंक्रीटीकरण करणे,३५ लक्ष; इस्लामपुरा भागात रस्ता कॉंक्रीटीकरण करणे,४० लक्ष; जपान जीन भागात रस्ते व ट्रीमिक्स कॉंक्रीटीकरण करणे ४० लक्ष; दस्तगीर कब्रस्थान विकसित करणे ३५ लक्ष.

ग्रामिण भागात येथे होणार कामे

कळमसरे येथे शादीखाना सामाजिक सभागृह बांधकाम करणे,१५ लक्ष; धार येथे पिरबाबा कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे ३० लक्ष; सारबेटा येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे १५ लक्ष; शिरसाळे येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे १५ लक्ष; पिळोदा येथे शदिखाना सामाजिक सभागृह बांधणे १५ लक्ष व रस्ता कॉंक्रीटीकरण करणे १० लक्ष.

या विकास कामांच्या मंजूरीबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,अल्पसंख्याक मंत्री ना अब्दुल सत्तार,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Exit mobile version