Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संबित पात्रा म्हणतात राऊत मोठ्या घोटाळ्यातील आरोपी !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत यांच्यावरील कारवाईने ईडीच्या गैरवापराचा आरोप होत असतांनाच आज भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी संबंधीत घोटाळ्याची आकडेवारी जाहीर करून राऊत यात आरोपी असल्याचा दावा केला आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीचा कारवाई योग्य असल्याचा युक्तीवाद राज्यातील भाजप नेते करत असतांना आता केंद्रीय पातळीवरून देखील याची पाठराखण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी या संदर्भात संजय राऊत यांच्या पत्राचाळ घोटाळ्याची नेमकी किती मोठी व्याप्ती आहे ? याची आकडेवारी सादर करून याबाबत राऊतांवरील कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे.

पात्रा म्हणाले की, संजय राऊत यांची न्यायालयाने कोठडीत रवानगी केली असून त्यांच्याविरोधात कागदपत्रे आहेत. पत्राचाळ हे जुने प्रकरण आहे. या जागेवर ४७ एकर जमीन आहे, याठिकाणी ६७२ कुटुंबे भाडेकरू म्हणून राहत आहेत. म्हाडाने २००७ मध्ये गुरु आशिष डेव्हलपर्ससोबत करार केला होता. प्रवीण राऊत हे डिरेक्टर आहे,त्यांनी करार पाळला नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी ९ खाजगी बिल्डरांना बोलावून जमीन ९०१ कोटींना विकली. त्यांनी एकूण १०४० कोटी जमा केले.

ते पुढे म्हणाले की, संजय राऊत यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या पत्नीला प्रवीण राऊत यांच्या पत्नीने कर्ज म्हणून ८३ लाख दिले होते. या प्रकरणी २०१८ मध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. आणि वारंवार समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. संजय राऊत हे एका पक्षाचे नेते आहेत म्हणून ईडीने तपास न करता प्रकरण बंद करण्याची गरज आहे का? असा सवालही पात्रा यांनी केला.

Exit mobile version