Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पूरस्थितीचा गैरफायदा घेत चढ्या भावात वस्तू विक्री ; जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाई इशारा

kolhapur new

कोल्हापूर, वृतसेवा | जिह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा गैरफायदा घेत जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने विकणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. अशा प्रकारे जर कोणी महागात वस्तू विकत असेल तर त्याची १०७७ आणि २६५५४१६ या क्रमांकांवर तक्रार नोंदवता येईल, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

पुरामुळे वाहतुकीसह संपूर्ण जनजीवनच ठप्प झाल्याने कोल्हापूर शहरात भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये भाज्यांचे दर कडाडले आहेत. वांग्याचा इथला दर २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. मार्केट यार्डमध्येच जर इतका दर असेल तर तो किरकोळ भाजी विक्रेत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर २५० ते ३०० रुपये इतका होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे सर्वच भाज्यांचे जर कडाडले आहेत. त्यामुळे आस्मानी संकटाने झोडपलेल्या कोल्हापूरकरांचे आता या महागाईने कंबरडे मोडले आहे.गेल्या आठवडाभरापासून पुराच्या पाण्याखाली गेलेल्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला अद्यापही पुराने वेढा दिला आहे. सर्वसामान्य लोकांचे यामुळे प्रचंड हाल झाले असून बचाव कार्य अद्यापही सुरुच आहे. काही प्रमाणात पुराचे पाणी ओसरल्याने मदत कार्यातील अडथळा दूर झाला आहे. त्यानंतर आता राज्याच्या विविध भागातून इथल्या जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरु झाला आहे मात्र, तो ही अपूरा पडत आहे. दरम्यान, स्थानिक दुकानदारांकडून आणि विक्रेत्यांनी लोकांना रोजच्या गरजेच्या वस्तूंची विक्री केली जात आहे. मात्र, काही विक्रेते या पूरस्थितीचा गैरफायदा घेत लोकांची वाढती मागणी पाहता आपल्याकडील वस्तू वाढीव दराने विकत आहेत. याबाबत अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्याने याची गांभीर्यतेने दखल घेण्यात आली आहे. जर कोणी विक्रेता अशा प्रकारे चढ्या दराने वस्तू विकताना आढळला तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version