Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकरे आग पिडीतांना मोदी आवास योजनेत घरकुल देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साकरे गावात आगीमुळे घर व मालमत्तांचे नुकसान झालेल्या चारही कुटुंबास शासनाच्या मोदी आवास योजनेतून घरकुल देण्यात येतील. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. शासन या पिडीत कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा विश्वास ही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज साकरे गावात भेट देत आग पिडीत कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी वैयक्तिक प्रत्येक कुटुंबाला दहा रूपयांची मदत केली. तसेच प्रत्येकाला गॅस, शेगड्या, तीन महिन्यांचा किराणा, भांड्यांचा संच, गहू व तांदूळ, साड्या व वस्त्रांच्या रूपाने पालकमंत्र्यांनी या कुटुंबास तात्काळ मदतीचा हात देत त्यांच्या दु:खावर फुंकर घातली. पालकमंत्र्यांची भेट घेतल्यावर पिडीत तिरूणाबाई पाटील यांना अश्रू अनावर झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांना दिलासा दिला.

याप्रसंगी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पिडितांना आठ दिवसांच्या आत मोदी आवास योजनेतून  घरकुल प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी धरणगाव तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी उपस्थित होते.

साकरे गावात १८ डिसेंबर रात्री ४ घरांना भीषण आग लागल्याची घटना रात्री १ वाजता घडली होती. या लागलेल्या आगीत रमेश‌ वना पाटील, वना सुकदेव पाटील, स्वप्निल अमृतकर आणि तिरुणाबाई वना पाटील यांच्या घरातील कापूस, पैसे व ऐवज जळून खाक झाले असून लाखांचे नुकसान झाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पिडित कुटुंबाच्या आग लागलेल्या घरात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी साकरे गावातील सरपंच श्रीकांत पाटील, पोलीस पाटील घन:श्याम पाटील, पदाधिकारी निलेश पाटील, सरिता कोल्हे – माळी, डी. ओ. पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रमोद पाटील, मोतीआप्पा पाटील, जगतराव पाटील, नवल पाटील, आसोदेकर तुषार महाजन, पुष्पा पाटील, रिया इंगळे, प्रियंका कोळी आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने साकरे ग्रामस्थ, तरूण व महिला उपस्थित होते

Exit mobile version