Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मर्दानी खेळ, व्याख्याने, पोवाडे, जागरण, गोंधळचा जागर करीत सह्याद्री प्रतिष्ठानची शिवरथ यात्रा उत्साहात

चाळीसगाव : दिलीप घोरपडे

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संघटनेची यंदा नवव्या वर्षी सालाबाद प्रमाणे शिवरथ यात्रा शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते शिव कर्मभूमी किल्ले रायगड अशी उत्साहात संपन्न झाली. या यात्रेदरम्यान महाराष्ट्राच्या विविध गावातून आलेल्या दुर्गसेवक सह्याद्रीच्या शिलेदारांनी गडकिल्ले संवर्धन संदेश यात्रा मार्गावरील गावांमध्ये दिला.

या शिवरथ यात्रेत शिवकालीन मर्दानी खेळ शिवव्याख्याते यांची व्याख्याने शाहीर वैभव घरत यांचे पोवाडे पारंपरिक गोंधळी यांमार्फत जागरण गोंधळ वेगळ्या गावातून सादर करण्यात आलेत. या कलाप्रकारातून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ साहेब यांचे विचार आचार आणि इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश यात्रा मार्गावरील गावागावात पोहोचण्यात आला. ढोल ताशे लेझीम पथके या पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये शिवरथ यात्रेचे स्वागत संपूर्ण मार्गावर विविध गावातून करण्यात आले. तर सवाष्णींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची औक्षण करून पूजा केली छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की, जय जिजाऊ मासाहेबांचा विजय असो ‘गड किल्ले वाचवा, महाराष्ट्र वाचवा’, अशा घोषणांनी संपूर्ण यात्रा गर्जत होती. यात्रेच्या समारोप प्रसंगी बारा मावळ परिसरातील सरदार घराण्यांमधील वारसदारांनी रायगडावर या यात्रेत हजेरी लावली. तर प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांनी आपले दुर्ग-संवर्धन विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आपल्या ओजस्वी वाणीतून सादर केले. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये होत असलेल्या या शिवरथ यात्रेने आता मोठे स्वरूप धारण केले असून प्रत्येक वर्षी या यात्रेत सहभागी होणाऱ्या दुर्ग सेवक शिलेदारांची संख्या लक्षणीय वाढत आहे. गड किल्ले संवर्धनाची श्रमिक गोजमगुंडे यांनी सुरू केलेली चळवळ आता महाराष्ट्रभर जोर धरू लागली आहे. शिवरथ यात्रा दुर्ग सेवक सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिलेदारांसाठी एक वारी असून संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी दुर्ग सेवकांचा एकमेकांना मनोभावे भेटण्याचा हा हृदय सोहळा असल्याने या यात्रेची शिवप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. समारोप प्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी येणाऱ्या सहा महिन्यांसाठी दिलीप सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व दुर्गसेवकांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.

Exit mobile version