Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनपा सफाई कर्मचाऱ्याचा आकस्मात मृत्यू

sonawane

जळगाव प्रतिनिधी । जेवणापूर्वी चक्कर येवून पडल्याने रुग्णालयात उपचारासाठी नेत असतांना 55 वर्षीय महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा आकस्मात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान आधीच आजारपण तसेच शरीरातील पाणी अचानक कमी झाल्याने उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम पाटील यांनी सांगितले.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा हुडको मरिमाता मंदिर पसिरातील सुपडू महावीर पवार (वय 55) हे पत्नी, तीन मुले, तीन मुली या परिवारासह राहत होते. 20 ते 22 वर्षापासून ते महापालिकेच्या आरोग्य विभागात स्विपर म्हणून कार्यरत होते. मोठा मुलगा सिध्दार्थ हाही हातमजुरी करुन उदरनिर्वाह भागविण्यास मदत करत आहे.

सोमवारी सुपडू पवार हे दुपारी 1 वाजता कामाहून परतले. यानंतर दुपारी झोपले. सायंकाळी त्यांनी पत्नी मंगला हिस मला जेवणात वरणभात खावयाचा असून स्वयंपाक करण्यात सांगितले. घरी मुली तसेच जावई आलेले होते. सर्व घरात गप्पा मारत होते. तर सुपडू पवार हे बाहेर खाटीवर बसले होते. स्वयंपाक तसेच जेवणाची वेळ झाल्याने मुलगा सिध्दार्थ सुपडू पवार यांना जेवणाबाबत बोलाविण्यास गेला. यावेळी त्यांनी मी थोड्या वेळाने जेवतो असे सांगितले. काही वेळाने गप्पा मारत असताना मुलांना तसेच जावई, मुली यांना पडण्याचा आवाज आला. सर्व जण बाहेर आल्यावर सुपडू पवार हे चक्कर येवून खाटीवर पडल्याचे लक्षात आले. जावयांसह मुलींनी त्यांना तत्काळ पिंप्राळा येथील खाजगी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले.

आईचा जीव दुखी सुखी आहे. तीही कायम आजार आहे. वडीलांच्या मृत्यूचे एैकून मोठा धक्का बसेल म्हणून रात्री 10 वाजेपासून ते दुसर्‍या दिवशी शवविच्छेदन होईपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत आईला वडील वारले असल्याचे कळविण्यात आले नसल्याचे अश्रू अनावर झालेल्या पवार यांच्या मोठ्या मुलाने बोलतांना सांगितले. रुग्णवाहिकेतून मृतदेह घरी नेण्याच्या काही मिनिटांअगोदर सिध्दार्थने त्याच्या आईला फोन करुन वडीलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी हलविण्यात आला. सुपडू पवार यांच्या मृत्यूने घरचा आधारवड हरपला आहे. तीन मुलींपैकी दोन विवाहित तर दोन मुले शिक्षण घेत आहेत. पवार यांच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर पडले असल्याने पिंप्राळा हुडकोत हळहळ व्यक्त होत आहे.

सुपडू पवार यांचे शरीरातील पाणी कमी झाले होते. अचानक उन्हाच्या कडाक्याने हे घडू शकते. पाणी कमी झाल्याने उष्माघाताचा फटका बसून त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच पवार यांचे आजारपणामुळे फुफुसही एकमेकांना चिपकलेले होते. दरम्यान शवविच्छेदनादरम्यान लक्षणांनुसार उष्माघाताने मृत्यू झाल्याचे लक्षात येते.
– डॉ. शुभम पाटील, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, जळगाव

Exit mobile version