Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरसंघचालकांनी टोचले भाजपा-सेना नेत्यांचे कान

mohan bhagwat

नागपूर, वृत्तसंस्था | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा व शिवसेना या दोन्ही मित्र पक्षात मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्यांवरून एकमत न झाल्याने, जनतेने कौल दिल्यानंतरही राज्यात महायुतीला सत्तास्थापन करता आलेली नाही. परिणामी सध्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या दोन्ही पक्षांना अप्रत्यक्षरित्या सुनावले असल्याचे समोर आले आहे. “आपसात भांडल्याने दोघांचेही नुकसान होते, हे माहिती असुनही काहीजण भांडतात” असेही त्यांनी म्हटले आहे. येथे आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

 

“स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र, आपल्या स्वार्थाला खूप कमीजण सोडतात. देशांचे उदाहरण घ्या किंवा व्यक्तींचे. माणसाला हे देखील माहिती आहे की, निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही विनाश होणार आहे. मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही. आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते. तरीदेखील आपसातील भांडणे अद्यापही बंद झालेली नाहीत,” असेही भागवत यावेळी म्हणाले.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना प्रत्यक्षात सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्ता स्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्ता स्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.

दरम्यान राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत होणारी काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक रद्द झाली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम असल्याने आघाडीची आज होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता ही बैठक उद्या होणार असल्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी वर्तवली आहे.

Exit mobile version