Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोहिणी खडसे यांचे पक्ष वाढीसाठी राज्यभरात दौरे !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यानंतर रोहिणीताई खडसे यांनी राज्यभरात दौरे केले असून यांना चांगला प्रतिसाद लाभला आहे.

रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संघटना बांधणी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले त्यांनी सुरू केलेली जनसंवाद यात्रा राज्यभरात चर्चेचा विषय ठरली.अनेक मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांचे कार्य बघून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांना राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या नंतर त्या लगेच मतदार संघात शेतकर्‍याच्या बांधावर धावून आल्या. बोदवड, कुर्‍हा परीसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले रोहिणी खडसे यांनी लागलीच नुकसानग्रस्त भागात शेती बांधावर पोहचून नुकसानीचे पंचनामे व खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासना सोबत संपर्क साधला. शेती पंपाला सुरळित विज पुरवठा होण्यासाठी शेतकर्‍या सोबत विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. गणपती उत्सवाच्या निमित्ताने गाव खेड्यातील गणेश मंडळ पर्यंत पोहचल्या. मतदारसंघात प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा नेम त्या गेल्या पाच सहा वर्षांपासून पाळत आल्या आहेत. रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात माझे घर राष्ट्रवादीचे घर हे अभियान राबविले.

शाळा बाह्य व शिक्षणापासून वंचित मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी गणेश उत्सवात श्री गणेशा शिक्षणाचा अभियान राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात राबविले त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा खा.सुप्रिया सुळे यांच्या सोबत नागपुर, वर्धा, अमरावती जिल्हा दौरा करून पक्ष संघटन बांधणी करण्या साठी नविन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या तसेच पक्ष पदाधिकारी मेळाव्यातून पक्षाची ध्येय धोरणे मांडली.

यासोबत रोहिणी खडसे यांनी सोलापूर, बीड जिल्हा दौरा करून महीला आघाडीच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पदाधिकार्‍यांना वेळ देउन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या माध्यमातून प्रदेश पातळीवर काम करतांना त्यांनी स्थानिक मतदारसंघातील जनतेशी असलेला संपर्क देखील कायम राखल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version