Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कापूस व्यापाऱ्याला लुटले; ७ लाखांची बॅग घेवून चोरटे पसार !

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कारला अडवून धुळे येथील व्यापाऱ्याची सुमारे ६ लाख ९५ हजार रुपयाची रोकड लांबवल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ धुळे येथील व्यापारी योगेश वाल्मीक पाटील (रा. निमडाळे ता. जि. धुळे) या व्यापाऱ्याने पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. ते स्वीफ्ट डिझायर कार (एम एच -०१-बी. टी.८७९६ ने तामसवाडी ता. पारोळा येथे शेतक-याची कापसाची उधारी देण्यासाठी पैसे घेऊन निघाले होते. कराडी गावाचे अलीकडे १ कि.मी अंतरावर दोन विना क्रमांकाचे दुचाकीवरील ४ इसमांनी कारचे पुढील बाजुस व मागून येऊन कार अडवून चावी काढून घेतली.

नंतर त्यांनी, फिर्यादीला “चुपचाप बैठनेका नही तो मार डालेगे” असे हिंदी भाषेत दम देवुन मागील सिटवर ठेवलेले ६ लाख ९५ हजार पांढ-या बॅगेतील रोख रक्कम बळजबरीने काढुन घेवुन बोळे गावाकडे पलायन केले. चारही अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग बसावे हे तपास करीत आहेत. पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून धुळ्याकडे रवाना करण्यात आले आहे. तर इतर बीट पोलीस कर्मचाऱ्यांना बोळे, कराडी, तामसवाडी, ढोली, वेल्हाने या परिसरात तपासासाठी पाठवण्यात आले आहे.

Exit mobile version