Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्यावसायिक वाहनांना ७०० कोटी रुपयांची रस्ते कर माफी देण्याचा राज्य सरकारचा विचार

मुंबई वृत्तसंस्था । पाच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे वाहतूक क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे . या पार्श्वभूमीवर १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळासाठी राज्यातील ११.४ लाख व्यावसायिक वाहनांना ७०० कोटी रुपयांची रस्ते कर माफी देण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मुख्यमंत्री यावर विचार करीत आहेत

परिवहन मंत्री अनिल परब यांनी या हालचाली सुरू केल्या होत्या. राज्यात ११.४ लाख नोंदणीकृत व्यावसायिक वाहने आहेत. यामध्ये पर्यटक टॅक्सी, मिनी बस, बस, स्कुल बस, ट्रक, टँकर आणि मालवाहू वाहने यांचा समावेश होतो. लॉकडाऊन केल्यापासूनच या सर्वांचा व्यवसाय ठप्प आहे. या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी कर माफी करणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.

गुजरात, राजस्थान, उत्तराखंड आणि हरियाणा यासह १२ पेक्षा जास्त राज्यांनी सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांना रस्ते करातून सूट दिली आहे. महाराष्ट्रात वाहनांचे दोन वर्ग आहेत. वर्षाला रस्ते कर देणाऱ्या वाहनांची संख्या ११.४ लाख एवढी आहे. त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांसाठी व्यावसायिक वाहनांना रस्ते करातून सूट दिली जाणार आहे.

राज्य सरकारला वाहतूक विभागाकडून सध्या कोणताही कर येत नाही. शिवाय सध्या पेट्रोल आणि डिझेलची विक्रीही कमी असल्यामुळे सरकारी महसूलही कमी आहे. याशिवाय विमा क्षेत्रही संकटात आहे. अनेक वाहन मालकांनी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन वाहने घेतलेली आहेत. त्यांना कर्ज परतफेड करण्यासाठी अडचणी येत आहेत.

Exit mobile version