Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्या दिसणार ‘रिंग ऑफ फायर’

Solar eclipse

मुंबई प्रतिनिधी । यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण उद्या (दि.२६) दिसणार आहे. या आधी दहा वर्षांपूर्वी कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसले होते. उद्या भारतात सकाळी ७.५९ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार असून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होणार आहे. याच वेळेत ‘रिंग ऑफ फायर’ पाहण्याची संधी मिळणार आहे. तर सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्य चंद्रामुळे झाकोळलेला दिसेल. तर सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.

ग्रहणाबाबत जेवढं आपल्या मनात कुतूहल असते, तेवढ्याच अंधश्रध्दाही. मात्र आकाश आणि खगोलप्रेमींसाठी ग्रहण ही अभ्यासासाठी एक सुवर्ण संधी असते. ग्रहण कसे आणि केव्हा दिसते, याबाबात आपल्या सर्वांना पुसटशी माहिती असतेच, कारण परीक्षेसाठी याचा अभ्यास आपण नक्कीच केला आहे. अशीच संधी दहा वर्षांनी भारतातील खगोलप्रेमींना मिळणार आहे. येत्या २६ डिसेंबरला सकाळी आठ ते अकरा या वेळेत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

या भागात दिसणार सूर्यग्रहण
यावर्षी भारतात कर्नाटकतील काही भाग, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडच्या राज्यात अरुंद मार्गिकेत हे ग्रहण सूर्योदयानंतर पाहता येणार आहे. तर, उर्वरित देशभरात हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल. दक्षिण भारतात कन्ननूर, कोईम्बतूर, कोझीकोडे, मदुराई, मेंगलोर, उटी, तिरुमलापल्ली आदी भागात हे ग्रहण कंकणाकृती स्वरुपात दिसेल. भारताबरोबरच नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भुतान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

पुढील वर्षीत या दिवशी दिसणार सूर्यग्रहण
कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून देखील हे ग्रहण दिसणार आहे. यादिवशी ‘रिंग ऑफ फायर’ पाहण्याचा उद्भूत योग येणार आहे. पु़ढील वर्षी २१ जून २०२० रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा व उत्तराखंड या राज्यातील प्रदेशातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून त्यावेळीही खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.

Exit mobile version