Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या

पुणे (वृत्तसंस्था) माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचे प्रकरण गाजलेल्या पुण्यात आता विनायक शिरसाट या माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. विनायक शिरसाट यांचा मृतदेह दरीत संशयास्पदरित्या आढळून आला आहे. शिरसाठ यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून वडगाव धायरी आणि परिसरातील अवैध बांधकामांविरोधात आवाज उठवला होता. म्हणूनच त्यांची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.

शिरसाट हे शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते होते. ते गेल्या आठ दिवसांपासून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसात केली होती. दरम्यान,विनायक शिरसाट हे राजकीय पक्षाशी देखील संबंधित होते. शिवणे येथील उत्तमनगर परिसरात राहणारे विनायक शिरसाट हे ५ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. त्यांच्या भावाने यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. सोमवारी दुपारी पोलिसांनी शिरसाट यांचे मोबाइल लोकेशन ट्रेस केले असता त्यांचा मोबाईल मुठा गावाच्या हद्दीत असल्याचे समोर आले. या आधारे पोलिसांनी मुठा गाव आणि लगतच्या परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली. या दरम्यान पिरंगूट ते लवासा मार्गावरील घाटात विनायक शिरसाट यांचा मृतदेह सापडला. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यांची हत्या झाल्याचे समजते.

Exit mobile version