ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत सुरू करा – काँग्रेसची मागणी

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे होऊनही मुक्ताईनगर तालुक्यात बऱ्याच ग्रामीण भागात बसेस बंद आहेत. मुक्ताईनगर आगारातून ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन काँग्रेसतर्फे आगार नियंत्रकांना देण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळापासून मुक्ताईनगर तालुक्यात बऱ्याच ग्रामीण भागात बसेस बंद होत्या. ग्रामीण भागातील काही बसेस सुरू झालेल्या आहेत. सध्यस्थितीत लग्नसराई, शेतीची कामे, कोर्टकचेऱ्या, तहसील, प्रशासकीय कामे, दवाखाने आदी नित्याच्या कामासाठी नागरिकांना तालुकास्तरावर यावे लागते. परंतु संपापूर्वी ज्या बसेस सुरू होत्या, त्यापैकी अजूनही पूर्ववत सुरू झालेल्या नाहीत. त्या नियमित वेळेनुसार पूर्ववत सुरु करण्यात याव्यात, प्रवाशांचे होणारी गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, भटक्या विमुक्त जाती जमाती महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अड्. अरविंद गोसावी यांचे नेतृत्वखाली काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सह्यांचे निवेदन आगारप्रमुख साठे यांना देण्यात आले.

याबद्दल वरिष्ठांशी चर्चा आणि विचारविनिमय करून प्रवाशांच्या अडचणीवर लवकरच मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन आगारप्रमुख साठे यांनी दिले.

यावेळी तालुका उपाध्यक्ष अनिल वाडीले, अड्. राहुल पाटील, तालुका एससी सेलचे अध्यक्ष निलेश भालेराव, जिल्हा एससी सेल उपाध्यक्ष गवई, शे.भैया.शे.करीम, नामदेव भोई आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content