Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन दिवसात निघणार विश्रामगृहाचे अतिक्रमण ! : न्हाईने बजावली नोटीस

जळगाव प्रतिनिधी | माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर आकाशवाणी चौकातील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या सेवामार्गामधील तापी पाटबंधारे महामंडळ विश्रामगृहाच्या  कुंपण भिंतीचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. आज या संदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अर्थात न्हाईने तापी महामंडळाला नोटीस बजावली असून यात तीन दिवसात अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या संदर्भात वृत्त असे की, जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग लगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर तापी पाटबंधारे महामंडळाचे विश्रामगृह असून सदर विश्रामगृहाचे दक्षिणेकडील भागाचे ६० मिटर रुंद राष्ट्रीय महामार्गाची हद्द आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाचे हद्दीमधेच दोन्ही बाजूस ९ मिटर रुंद सेवामार्ग (व्हिस रोड) आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तरेकडील प्रस्तावीत ९ मिटर सेवामार्गामध्ये तापी पाटबंधारे महामंडळ विश्रामगृहाचे कुंपणभिंतीचे अतिक्रमण करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हे अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी ४ ऑक्टोबर रोजी दीपक कुमार गुप्ता यांनी निवेदन दिले होते.

यात गुप्ता यांनी म्हटले होते की, भविष्यात जळगाव महानगरपालीकेकडून अथवा राष्ट्रीय महामार्गाकडून सेवामार्ग विकसीत करावयाचे झाल्यास तापी पाटबंधारे महामंडळ विश्रामगृहाचे कुंपणर्मितीचे अतिक्रमणामूळे सेवामार्ग विकसीतच होऊ शकत नाही. या  सेवामार्गाचा अंतर्भाव हा जळगाव शहराचे मंजूर विकास योजनेमध्ये दर्शविला आहे. या योजनेची अमलबजावणी करण्याची जबाबदारी सुध्दा महानगरपालीकेची आहे. साधारणत: १०-१२ वर्षापूर्वीचे सदर कुंपणभिंतीचे बांधकाम करुन जागा अतिक्रमीत झाली आहे.  महानगर पालीका हद्दीमध्ये कोणत्याही शासकीय विभागास विकासकामे करावयाची झाल्यास त्यांना कोणतीही पुर्व परवानगीची गरज नाही. मात्र, विकास कामे हाती घेण्यापूर्वी स्थानिय प्राधिकरणास कोणतीही सुचना देण्यात आलेली नाही. संबंधीत अतिक्रमणस्थीत असेलेल्या ठिकाणी मुख्य चौफूलीवर अर्थात आकाशवाणी चौकात सर्कल उभारण्यात येत असून या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. यामुळे हे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे अशी मागणी गुप्ता यांनी केली होती.

दीपक कुमार गुप्ता यांच्या निवेदनाची दखल घेऊन राष्ट्रीय राजामार्ग प्राधीकरण म्हणजेच न्हाईने तापी महामंडळाला संबंधीत अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली असून या संदर्भातील माहिती गुप्ता यांना ई-मेलद्वारे दिलेली आहे. यात न्हाईने केलेल्या तपासणीत संबंधीत अतिक्रमण केल्याची निष्पन्न झाले आहे. यामुळे हे अतिक्रमण तीन दिवसात काढण्यात यावे अशा सूचना देखील नोटीसमध्ये देण्यात आलेल्या आहेत. यामुळे तीन दिवसात हे अतिक्रमण निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version