Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठात सेमीकंडक्टर डिव्हायसेस फॅब्रिकेशनचे प्रशिक्षणाला प्रतिसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेतील क्लास १०००० क्लीन रूम या अद्ययावत प्रयोगशाळेत नॅनो स्केल सेमीकंडक्टर डिव्हायसेस फॅब्रिकेशनच्या ३० तासाचे हाताळणी प्रशिक्षण वर्गाचा समारोप विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांच्या उपस्थितीत झाला.

या प्रशिक्षणाकरीता पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांनी क्लीन रूम मधील सर्व नियमावली पाळून स्वतः सेमीकंडक्टर वेफरवर MOS डिव्हायसेस बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी समन्वयक प्रा. ए. एम. महाजन यांनी नाविन्यतापूर्ण प्रशिक्षण उपक्रमाबद्दलची सविस्तर माहिती देऊन आपल्या विद्यापीठात प्रथम प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रा. एस. टी. इंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संगितले की, विद्यापीठात असा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला की ज्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले गेले. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रा सोबत त्यांनी स्वतः बनवलेले डिव्हायसेस असलेली सिलिकॉन वेफर सोबत नेत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या प्रसंगी अधिष्ठाता प्रा. डोंगरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र व स्वतः सेमीकंडक्टर वेफरवर बनवलेले MOS डिव्हायसेस देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी वैभव बोरोकार, डॉ. स्वाती गुप्ता, अभिषेक चौधरी, भुषण देसले, अश्विनी घाटे यांनी सेमीकंडक्टर डिव्हायसेस फॅब्रिकेशन प्रणाली हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. प्रा. भुषण चौधरी, डॉ. ललित पाटील, मोहिनीराज नेतकर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार डॉ. डी. जे. शिराळे यांनी मानले.

Exit mobile version