मुलांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आदर करा – चंद्रकांत भंडारी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | “मुलांना कुटुंबातील उपव्यक्ती न समजता त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आदर करा.” असे प्रतिपादन केसीई सोसायटीच्या शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी केले.

केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील शाळेतर्फे दि.१ जून २०२२ रोजी जळगाव येथे वैश्विक पालकत्व दिनानिमित्त “चला उत्तम पालक बनू या” कार्यक्रमांतर्गत ए.टी.झांबरे विद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. यात चंद्रकांत भंडारी मार्गदर्शन करतांना बोलत होते. अध्यक्षस्थानी ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे तर प्रमुख अतिथी गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील उपस्थित होत्या.
मार्गदर्शनात पुढे चंद्रकांत भंडारी यांनी सांगितलं की ” पालकांनी निव्वळ परीक्षेच्या गुणांवर प्रगतीचे मूल्यमापन न करता मुलांच्या अभिरुची, आवड, छंद समजून प्रोत्साहन दिल्यास गुणवत्ता झपाट्याने वाढते. मुलांची वारंवार इतरांशी तुलना करून नाऊमेद केल्याने न्युनगंड वाढून मुले आत्मप्रतारणा करतात. वेळप्रसंगी आत्महत्याही करतात.धावपटू सुवर्णकन्या पी.टी.उषा यांच्या मातोश्री लक्ष्मी व एका रसायन शास्त्रंज्ञांचे त्यांनी समयोचित दाखले दिल्याने पालक भारावले. मुलांमधील कमतरतेवर वारंवार भाष्य न करता त्यांच्या अन्य गुणांचे कौतूक करून त्यांचा आत्मविश्वास वाढून मुले आपोआप कर्तव्यतत्पर होऊन उत्स्फूर्तपणे जबाबदारी स्विकारतील. मुले घडवतांना आत्मपरिक्षणातून स्वतःचे सुजाण पालकत्वही घडवता आले पाहिजे ”
अध्यक्षीय भाषणात ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे म्हणाल्या की,”मुलांशी मोकळं बोलून त्यांना मोकळं करावं.मुलांच्या विचारप्रक्रिया जागृत करुन सुरू ठेवणं हे सुजाण पालकत्वाचे सर्वोत्तम लक्षण
आहे. कोरोना महामारीने अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. त्यामुळे मुलांचा घरी गृहपाठ घेतांना पालकांनी पालकनीतीत परिवर्तन आणून त्यांच्या भावविश्वाशी एकरूप झाले पाहिजे. कोरोना काळात झालेली शिक्षणाची वाताहत लक्षात घेता गुणवत्तेचा अट्टाहास न करता पालकांनी मुलांना मुलभूत क्षमतांची उजळणी घेऊन दृढीकरण अग्रकमाने करून घेतलेच पाहिजे.” प्रश्नोत्तराच्या खुल्या चर्चासत्रात शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी पालकांना बोलतं करून त्यांच्या शंकाचे समाधानकारक निरसन करून केसीई सोसायटी प्रकाशित प्रबोधन पुस्तिका पालकांना मोफत दिल्या.
प्रारंभी गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी वैश्विक पालकत्व दिनाची संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रमाला निवृत्त प्राथमिक शिक्षक विजय लुल्हे यांच्यासह के.सी.ई. सोसायटी अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुजाण मातापिता पालक बहुसंख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी मानले.

Protected Content