Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजस्थानच्या सर्व मंत्र्यांच्या राजीनामा

जयपूर वृत्तसंस्था | राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या सर्व मंत्रीमंडळाने राजीनामा दिला असून उद्या सायंकाळी नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा दिला आहे. राजस्थानच्या मंत्रिमंडळात कॉंग्रेसकडून फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. यात कॅबिनेटमधील तीन ते चार मंत्र्यांच्या जागी नवे चेहरे पाहायला मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण आज गेहलोत यांच्या सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे आता संपूर्ण नवीन मंत्रीमंडळ अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांच्या निवासस्थानी आज महत्त्वपूर्ण बैठक झाल्यानंतर सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. उद्या दुपारी दोन वाजता प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यालयात बैठक होणार असून यात पुढील सर्व निर्णय होणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा देखील जयपूरला पोहोचले आहेत.

Exit mobile version