Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !

जळगाव– लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘राजकीय व सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी यावी.’ असे निवेदन जळगाव महाविकास आघाडीतर्फे जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व सायबर क्राईम सेल जळगावचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना देण्यात आले.

या निवेदनात, “राष्ट्रीय नेते व महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या फोटोचे विडंबन करून आढळ मावशी व मौलानांचा चेहरा व इतर चेहरे लावून तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याही फोटोचे विद्रुपीकरण करून वेगवेगळ्या कॉमेंट्स फेसबुकवर पाठवणारे हेमंत डोलारे हे जळगाव येथील रहिवासी असून नेहमीच व अनेक दिवसापासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अजित पवार, सुप्रिया सुळे व देशातील इतर नेत्यांच्या बाबतीत उपरोधिक टीका टिप्पणी करून त्यांच्या चेहऱ्यांचे विद्रुपीकरण करून देशातील व समाजातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतात.

एका विशिष्ट राजकीय पार्टीचे समर्थन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांची बदनामी करून चुकीची प्रतिमा समाज माध्यमात पसरवित असतात. त्यांच्या या बेताल वागण्याने समाजात तेढ निर्माण होत असून राजकीय व सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम हेमंत डोलारे हे करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. गुन्हा नोंदविण्यात यावा” असे निवेदन जळगाव महाविकास आघाडीतर्फे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व सायबर क्राईम सेल जळगावचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना देण्यात आले.

निवेदन देतांना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महानगराध्यक्ष शामकांत तायडे, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, माजी नगरसेवक राजू मोरे, डॉ.रिजवान खाटिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे, अकिल पटेल, विशाल देशमुख, नईम खाटिक, संजय जाधव, किरण चव्हाण काँग्रेसचे प्रदीप सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version