Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळावरील उपाययोजनेचे काम प्रगतीपथावर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्याकडे रस्त्यावरील वाढते अपघात अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियाना प्रसंगी जिल्हा नियोजन मधून अपघात प्रवणस्थळाच्या उपाययोजनासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यात त्या निधीतून अपघात प्रवण स्थळाचे काम सुरु झाले आहे. त्याबद्दल पालकमंत्री यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अपघात प्रवण स्थळांचे मोटार वाहन निरीक्षक यांचेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले.सर्वेक्षणादरम्यान संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघात होणा-या एकूण ६८ अपघात स्थळांची निश्चित करण्यात आली. या ६८ अपघात स्थळाची यादी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या मान्यतेने जिल्हा नियोजन समिती समोर ठेवण्यात आली.
६८ अपघात स्थळांपैकी तातडीच्या २४ स्थळांवर आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याकरीता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रु.१.३५ कोटी इतक्या निधीच्या तरतुदीस मान्यता दिली.
त्या जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीमधून हे काम तात्काळ सुरु करण्यात आलेले आहे.
२४ पैकी बहुतेक अपघात स्थळावर आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबतचे कामकाज अंतिम टप्प्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव (अ.का.)श्याम लोही यांनी दिली.

Exit mobile version