Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीएमसी बँक खातेदारांना दिलासा; आपत्कालीन परिस्थितीत काढता येणार १ लाख रुपये

PMCjfif

 

मुंबई वृत्तसंस्था । पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खातेदार आता वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत बँकेतून एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात. यासाठी त्यांना आरबीआयने नियुक्त केलेल्या प्रशासकाची मदत घ्यावी लागेल. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रातून आरबीआयने ही माहिती दिली.

रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. हवालदिल झालेले खातेदार मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. या खातेदारांना आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खातेदारांना एक लाख रुपये काढता येतील. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या प्रशासकांशी संपर्क साधावा लागणार आहे. आरबीआयने ही माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. बँक खात्यातून पैसे काढण्यावरील बंदीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी आरबीआयनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात खातेदारांना विवाह, शिक्षण यांच्यासह अन्य आपत्कालीन स्थितीत ५० हजारांपर्यंतची रक्कम काढता येते, असे नमूद केले आहे.  ‘अडचणीत सापडलेले खातेदार-ठेवीदार आरबीआयनं नेमलेल्या प्रशासकांशी संपर्क साधू शकतात. त्यांना बँक खात्यातून १ लाख रुपये काढण्याची परवानगी मिळवता येईल,’ असं आरबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. रक्कम काढण्यावर जी बंदी घातली आहे, ती बँक आणि ठेवीदारांच्या हितांच्या रक्षणासाठी गरजेची आहे, असेही आरबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Exit mobile version