Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नियमात शिथीलता : हॉटेल्स व दुकानांच्या वेळा वाढणार !

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यात येणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या टास्क फोर्समध्ये घेण्यात आला. याबाबत लवकरच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे,  मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ दिलीप म्हैसेकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत हॉटेल्स आणि दुकानांच्या वेळा वाढविण्यासह अन्य बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. २२ ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांचीदेखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या. तर, दुसरी लाट ओसरली असली तरी तिसर्‍या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणार्‍या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Exit mobile version