Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकरेंचा दणका : बंडखोरांची खाती अन्य मंत्र्यांकडे सोपविली !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची खाती ही उर्वरित चार मंत्र्यांकडे सोपविण्यात आली असून या माध्यमातून ठाकरेंनी बंडखोरांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. यामुळे बंडखोर मंत्री हे बिनखात्याचे मंत्री उरले आहेत.

सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष असे एकूण नऊ मंत्री आहेत. तर उध्दव ठाकरे यांच्याकडे फक्त आता चार मंत्री उरलेली आहेत. कालच या मंत्र्यांना बरखास्त करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. तथापि, असे न करता, आज या सर्व मंत्र्यांची खाती ही शिवसेनेच्या अन्य मंत्र्यांकडे सोपविण्यात आलेली आहेत. यात एकनाथ शिंदे यांचे खाते हे सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आले आहे. गुलाबराव पाटील यांचे पाणी पुरवठा व स्वच्छता खाते हे अनिल परब यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. दादा भुसे यांचे खाते शंकरराव गडाख यांना, उदय सामंत यांची खाती ही आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नांवासमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. तर गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे सोपवण्यात आलंय. दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देम्यात आलं आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात-

शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.); राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) यासोबत बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई यांची खाती देखील इतर मंत्र्यांना सोपविण्यात आलेली आहे.

या माध्यमातून उध्दव ठाकरे यांनी आता मंत्रीमंडळात फेरबदल केला असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले मंत्री हे बिनखात्याचे मंत्री म्हणून उरले आहेत. यावर आता शिंदे यांच्या गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार याची उत्सुकता लागली आहे.

Exit mobile version