Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर मुख्यमंत्रीपदासह शिवसेनेचे पक्ष प्रमुख पदही सोडणार ! : उध्दव ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसैनिकांना मी नकोसा झाले असेल तर त्यांनी सांगावे. आपण मुख्यमंत्रीपदच नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्यासही तयार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. राज्यातील प्रचंड राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतांना ते बोलत होते. त्यांनी थेट काहीही घोषणा न करता भावनिक साद घातली.

आज दिवसभर प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. यात विधानसभा बरखास्त करणार की, मुख्यमंत्री राजीनामा देणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती देण्यात आली होती. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या फेसबुक लाईव्हकडे लागले होते. यासाठी पाच वाजेची वेळ देण्यात आली असली तरी ४० मिनिटे झाले तरी फेसबुक लाईव्ह सुरू झाले नाही. यानंतर फेसबुक लाईव्ह सुरू झाले.

यात उध्दव ठाकरे म्हणाले की, आज सकाळी माझी कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत कोविडचे सावट आले. त्या कालखंडात देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझी गणना करण्यात आली. त्यानंतरचे दोन-तीन महिने विचीत्र होते. त्या काळात ऑपरेशन झाल्यामुळे मी कुणाला भेटलो नाही. हा मुद्दा बरोबर होता. नंतर मात्र मी सर्वांना भेटत होतो. आम्ही कधीही हिंदुत्व सोडले नाही. अलीकडेच आदित्य आणि अन्य मंत्री अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाबाबत विधीमंडळात बोलणारा मी कदाचित पहिला मुख्यमंत्री असावा. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेली नाही असे उध्दव ठाकरे म्हणाले. आजही बाळासाहेबांचीच शिवसेना असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सध्या जे काही होत आहे त्यावर काही बोलायचे नाही. विधानपरिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी मी हॉटेलवर गेलो. तेथे थोडे संशयास्पद वातावरण वाटले. आता अनेक आमदार फोन करत आहेत. आपण शिवसेना प्रमुखाला दिलेले वचन पूर्ण करणार आहे. शरद पवार आणि नंतर सोनिया गांधी यांच्या विनंतीवरून आपण मुख्यमंत्रीपद सांभाळले असल्याची माहिती त्यांनी दिली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने नव्हे तर आपल्याच लोकांनी आपण मुख्यमंत्रीपद नको हवे असे म्हटल्याचे आपल्याला खूप वाईट वाटल्याचे ते म्हणाले. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ असल्याचे ते म्हणाले. आपण राजीनाम्याचे पत्र तयार करत असून बाहेर गेलेल्यांनी हे पत्र राज्यपालांना द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तर आपण शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यासही तयार असल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version