Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात सत्तेसाठी पुन्हा ‘पुलोद’सारख्या प्रयोगाची तयारी ?

pulod sarkar

मुंबई, वृत्तसंस्था | शिवसेनेच्या सत्तेच्या समसमान वाटपाच्या आग्रहामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा गाडा अडकला आहे. शिवसेना मागणीवर ठाम असताना भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावर कोणतीही तडजोडीची भूमिका घेतली जाताना दिसत नाही. मात्र, भाजपा-शिवसेनेतील तणावामुळे नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, राज्यात पुन्हा ‘पुलोद’सारखा राजकीय प्रयोग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे शरद पवारांसह दोन नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आली आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची शनिवारी बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले होते. “महाराष्ट्रात याआधी असं झालं आहे. जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभेचे सदस्य आहेत. समाजातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत,” असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. सभागृहात नसलेली, राज्यसभेची सदस्य असलेली, समाजात महत्त्वाचे स्थान असलेली व्यक्ती म्हणजे कोण? याचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे यामुळे राज्यात पुन्हा एकदा ‘पुलोद’ (पुरोगामी लोकशाही दल) सारखा राजकीय प्रयोग होण्याची चिन्हे दिसत आहे.

अजित पवारांनी केलेल्या सूचक विधानानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. शरद पवार सध्या पक्षाच्या अध्यक्ष पदाबरोबर राज्यसभेचे खासदार आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली नसली तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला इतर पक्षातून पाठिंबा मिळू शकतो. शिवसेनेकडे ६३ आमदारांचे संख्याबळ असून, त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचा क्रमांक येतो. तर शिवसेनेला पाठिंबा द्यावा, या मताचा एक प्रवाह काँग्रेसमध्येही आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही बहुमत सिद्ध करण्याइतक संख्याबळ शिवसेनेकडे असल्याचा दावा केला होता. भाजपा वगळता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधूनच शिवसेनेला पाठिंबा दिला जाऊ शकतो. त्यामुळे नवी समीकरणे अस्तित्वात येणार की, भाजपा मुख्यमंत्रीपदावरून तडजोड करून युतीची सत्तास्थापन करणार ? हे अजूनही स्पष्ट होताना दिसत नाही.

Exit mobile version