Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाथाभाऊंच्या नाराजीचे रावेर तालुक्यात उमटणार पडसाद ?

eknath khadse

रावेर, प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर नाराज असून त्यांनी नुकतेच पक्षांतर करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातही भाजपातील त्यांचे खंदे समर्थक नाथाभाऊंच्या निर्णयानंतर काय निर्णय घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

भाजपाने नाथाभाऊंना आमदारकीचे तिकीट नाकारल्याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करणारे कार्यकर्ते, तसेच पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तालुक्यात आहेत. खडसे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्यास त्यामुळे तालुका भाजपामध्ये किती खळबळ माजते, याकडे कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचेही लक्ष असेल. सद्यस्थितीत तालुक्यातील आमदारकी सोडली तर सर्वत्र भाजपा अग्रेसर आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते नाथाभाऊंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यास मुक्ताईनगर नंतर सर्वात जास्त त्यांना मानणारा वर्ग रावेर-यावल विधानसभा क्षेत्रात आहे.

तालुक्यात भाजपाची आहे मोठी ताकद आहे. रावेर तालुक्यात भाजपाकडे सावद्याची नगर पालिका, रावेर पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे चार सदस्य इतर काही मोठ्या संस्था सध्या भाजपाकडे आहेत. सोबतच कार्यकर्त्यांची मोठी फौज भाजपाकडे आहे. आगामी काळात रावेर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पदाची निवडणूक तोंडावर असून सुमारे आठ महिन्यांनी तालुक्यातील ४६ ग्राम पंचायतीच्या निवडणुकाही आहेत. वर्ष भरात रावेर कृषी उपन्न बाजार समितीची निवडणूक आहे. यामुळे नाथाभाऊंनी वेगळा निर्णय घेतल्यास याचा फटका कुठे बसेल व सोबत कोण येईल, हे भाजपा व नाथाभाऊ यांच्यासाठी येणारा काळच ठरवणार आहे.

Exit mobile version