Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवीदिल्लीत विमानतळावर बेवारस बॅगेत आढळले आरडीएक्स

dillhi airport

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे एक संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ उडाली. टर्मिनस तीनवर असलेल्या या बॅगेत सुरक्षा यंत्रणांना आरडीएक्स असल्याचे आढळून आले आहे. या बेवारस बॅगेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही बॅग ताब्यात घेतली आहे. या बँगेत आरडीएक्स मिळाल्याचे वृत्त समोर आले असले तरी दुपारी १२.०० वाजेपर्यंत तरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) या वृत्ताला दुजोरा दिलेला नव्हता.

 

प्राप्त माहितीनुसार विमानतळावरील टर्मिनस तीनच्या पीलर क्रमांक चार जवळ मध्यरात्री १.००च्या सुमारास तपासणीदरम्यान सीआयएसएफचे हवालदार व्ही.के. सिंह यांना एक संशयास्पद बॅग अढळून आली. त्यानंतर या बॅगेची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यावर पोलिसांचे एक पथक या बॅगेची तपासणी करण्यासाठी दाखल झाले. संशयास्पद बॅग मिळाल्याची बातमी मिळाल्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला होता. बॅग ज्या ठिकाणी होती, त्या परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली. टर्मिनस तीनमधून कोणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. पोलिसांनी या बॅगेची तपासणी केली असता तिच्यामध्ये आरडीएक्स आढळून आले. असे असले तरी सीआयएसएफने या बॅगेमध्ये काय आहे ? हे फोरेन्सिक चाचणीनंतरच समजू शकेल असे सीआयएसएफचे अतिरिक्त महासंचालक एम.ए. गणपती यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे.

Exit mobile version