Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीएमसी बँक खातेदारांना आरबीआयचा दिलासा

pmc bank 300x162

मुंबई प्रतिनिधी । आर्थिक निर्बंध लादलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांना रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिलासा दिला आहे. बँक खात्यातून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली असून काही अटींच्या पार्श्वभूमीवर खातेदारांना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या ४० हजारांच्या अटीव्यतिरिक्त आता ५० हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.

पीएमसी बँकेच्या खातेदारांना पैसे काढता न आल्यानं एका खातेदारानं आत्महत्या केली होती. तर एकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. तर मुलुंडमधील एका वृद्धाला उपचारासाठी रक्कम न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. संजय गुलाटी (वय-५१) आणि फत्तेमुल पंजाबी (वय-५९) अशी या खातेदारांची नावे आहेत. नोकरी गमावलेल्या गुलाटी यांचे आर्थिक गाडे बँकेत ठेवलेल्या रकमेच्या व्याजावर सुरू होते. तर व्यावसायिक असलेले फत्तेमुल पंजाबी मोठी रक्कम बँकेत अडकल्यामुळे प्रचंड चिंतेत होते. ओशिवरा येथे राहणाऱ्या गुलाटी यांच्या खात्यात जवळपास ९० लाख तर मुलुंडमधील फत्तेमुल पंजाबी यांच्या खात्यात १० लाखांहून अधिक रक्कम जमा होती. पीएमसी बँकेवर आलेल्या र्निबधांनंतर पैसे परत मिळण्याची शाश्वती वाटत नसल्याने ते दोघेही मानसिक तणावात असल्याची माहिती त्यांच्या परिचितांनी दिली. अशातच आता पीएमसीच्या खातेधारकांना त्यांच्या खात्यांतून रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या ४० हजार रूपयांच्या निर्बंधांव्यतिरिक्त ५० हजार रूपये काढता येणार आहेत.

Exit mobile version