Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथे वैयक्तीक शौचालय योजनेत गैरव्यवहार ; चौकशीसाठी त्री सदस्यीय समिती गठीत

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक शौचालय योजनेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी बीडीओ दीपाली कोतवाल यांनी त्री सदस्यीय समिती गठीत केली आहे.

स्वच्छ भारत योजनेनंतर्गत दिलेल्या लाभाच्या माहितीचा अहवाल चौकशी करून सात दिवसात हि समिती बीडीओ कोतवाल यांना सादर करणार आहे. यामुळे पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

येथील पंचायत समिती मार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या नागरिकांना लाभ देण्यात येतो. मात्र या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या विभागाची पंचायत समिती अंतर्गत चौकशी करण्यासाठी बीडीओ कोतवाल यांनी सहायक प्रशासन अधिकारी राजाराम काळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ज्ञानदेव निळे व अनिल चौधरी या तिघांची त्री सदस्यीय समिती नेमली आहे.

या समितीने ऑगस्ट २०२० ते आजपर्यंत स्वच्छ भारत मिशन कक्षात प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संपूर्ण चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण चौकशीचा अहवाल सात दिवसात समिती बीडीओंकडे पुढील कारवाईसाठी सादर करणार आहे.

सिईओ रावेरकडे लक्ष द्यावे जनतेची मागणी

रावेर पंचायत समिती नेहमी या-नि-त्या कारणामुळे चर्चेत असते. ग्रामीण जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सिईओ डॉ पंकज आशियांकडे रावेर भागातील तक्रारी वाढत आहे.आपसी हेवे-दाव्यांमुळे प्रकाशझोतात असणारी पंचायत समितीत सोई-प्रमाणे प्रशासन चालवले जात असल्याची ओरड आहे. मध्यंतरीच्या काळात येथिल कारभारा बद्दल जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन यांनी देखिल नाराजी व्यक्त केली होती.

 

Exit mobile version